मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांमध्ये एक ‘मैलाचा दगड’ ठरलेले नाटक म्हणजे ‘संगीत कटय़ार काळजात घुसली’! या ‘कटय़ारी’ने मराठी रसिकांच्या मनात घर केले आहे. आता ‘कटय़ार काळजात घुसली’ रंगमंचावरून थेट मोठय़ा पडद्यावर दाखल होणार आहे. हे नाटक आता चित्रपटरूपात मराठी रसिकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. हा चित्रपट १३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेले आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत दिग्दर्शनाने नटलेले हे नाटक मराठी रंगभूमीवर अत्यंत यशस्वी ठरले. ‘कला मोठी की कलाकार’, ‘घराणे मोठे की कलाकार’ अशा संघर्षांवर प्रकाश टाकणाऱ्या या नाटकाद्वारे पं. वसंतराव देशपांडे यांच्यातील अभिनयाचे गुणही रसिकांना पुरेपूर अनुभवता आले होते. त्यांनी साकारलेले खाँसाहेब, त्यांची गायकी, नाटकातील चिजा यांचे गारूड आजही मराठी रसिकांवर आहे.
आता हेच नाटक चित्रपटरूपात रसिकांसमोर आणण्याचे शिवधनुष्य सुबोध भावे यांनी पेलले आहे. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य टिळक’ अशा एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्यानंतर सुबोध भावे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. सुनील फडतरे आणि एस्सेल व्हिजन हे या चित्रपटाची निर्मिती करत असून नाटकाचे पटकथेत रूपांतर आणि संवाद यांची जबाबदारी हिंदीतील प्रख्यात पटकथालेखक प्रकाश कपाडिया यांनी पार पाडली आहे. हा चित्रपट भाऊबीजेच्या मुहूर्तावर म्हणजेच १३ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत झळकेल, असे सुबोध भावे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या चित्रपटात दिग्गज कलाकारांची मांदियाळी असली, तरी त्याबाबत आत्ताच काही सांगणे योग्य ठरणार नाही, असेही भावे यांनी स्पष्ट केले.