‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न्‌ साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. मराठी, हिंदीसह गुजराती व नेपाळी भाषेतही गायन केलेल्या उषाताईंनी भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व प्रकारांत आपली सुरेल मोहोर उमटवली. त्यांच्या या अविस्मरणीय सांगितिक कारकिर्दीला मानवंदना म्हणून पीपल्स आर्ट्स सेंटर तर्फे ‘सुपरहिट मराठी म्युझिक मस्ती’ संगीतरजनीचा कार्यक्रम  गुरुवारी १० सप्टेंबरला सायं ७.३० वा. षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री.विनोदजी तावडे यांच्या हस्ते उषाताईंचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. संगीत क्षेत्रातील असंख्य मान्यवर या सोहळ्यास उपस्थितीत राहणार आहेत. या सत्कार समारंभानंतर उषाताईंच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. या संगीत रजनीमुळे उषाताईंची निवडक गीते ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
या सदाबहार गीतांचे सादरीकरण सुदेश भोसले, स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे बेला शेंडे हे दिग्गज गायक करणार आहेत. अभिनेत्री मानसी नाईकच्या दिलखेच नृत्याची अदाकारी सुद्धा या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी पुष्कर श्रोत्री सांभाळणार आहेत. उषाताईंची गीते व त्या गीताबद्दलच्या आठवणींना ‘सुपरहिट मराठी म्युझिक मस्ती’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने उजाळा मिळणार आहे. संगीत रसिकांनी चुकवू नये असा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी तिकीटांची बुकिंग सुरु असून सकाळी १० ते सायं ७ वा. पर्यंत षण्मुखानंद सभागृहात तिकीटं उपलब्ध होतील.