महानायक अमिताभ बच्चन यांचा टीव्हीवरील प्रसिद्ध गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या ८व्या पर्वाचे उद्घाटन सुरतमध्ये दणक्यात करण्यात आले. या पर्वाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. सुरतवासीयांच्या समक्ष हा प्रश्नमंजुषेचा खेळ खेळण्यात आला. दिपा जगतियानी या स्थानिक मुलीने आपल्या नगरवासियांच्या साक्षीने ६ लाख ४० हजार रुपये इतकी रक्कम जिंकली. आपल्या भावाला त्याच्या व्यवसायात मदत करणाऱ्या दिपाने या खेळादरम्यान ऑडियन्स पोल, फोन अ फ्रेण्ड आणि त्रिगुणी या आपल्या जीवनदायीनींचा वापर केला. ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘हु वॉन्टस् टू बी अ मेलियनर’ या खेळावर आधारीत भारतीय शैलीतील रुपांतर आहे. १४ प्रश्न असलेले यावेळचे पर्व दर्शकांची उत्सुकता वाढविणार असून, यावर्षासाठीची पारितोषिकाची सर्वात मोठी रक्कम ही ७ कोटी इतकी आहे. सोनी वाहिनीवर १७ ऑगस्टपासून हा शो सुरू होत आहे.