आमच्या घरच्या गणपतीची ६३ वर्षांपासूनची परंपरा आहे. माझ्या बाबांच्या जन्मापासून बाप्पा आमच्या घरी येतोय. गणेशोत्सवाचं एक वैशिष्टय़ आहे. ते म्हणजे इतर अनेक सणांना लोक मंदिरांमध्ये देवाचं दर्शन घ्यायला जातात. हा एकच सण असा आहे की, या सणात देव स्वत:च भक्तांच्या घरी येतो. ‘अतिथी देवो भव’ असं आपली संस्कृती सांगते. घरी आलेल्या पाहुण्यांना देवासारखं वागवण्याची आपली संस्कृती आहे. तर मग देवच जर आपल्या घरी आला तर तो आनंद नक्कीच वेगळा असतो. मला गणेशोत्सवात असंच वाटत असतं. वर्षांतले दोन दिवस मी अजिबात काम करत नाही. गणपतीचे दोन दिवस. माझ्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे तयारीचा एक दिवस आणि गणपतीचे हे दोन दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचे असतात. बाप्पाच्या दर्शनासाठी आमच्या घरी जवळपास हजारहून अधिक माणसं येतात. या दोन दिवसांतही मी खूप बिझी असतो. पण, ते फक्त बाप्पासाठीच. वर्षभर भेटता न आलेले काही नातेवाईक बाप्पाच्या निमित्ताने आवर्जून भेटायला येतात. मागच्या वर्षीपासून इको-फ्रेंडली गणपतीची आम्ही सुरुवात केली आहे. तसंच गेल्या काही वर्षांपासून शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत होतो. पण, त्यातही आता बदल केलाय. गणपतीची पंचधातूची मूर्ती तयार करून घेतली आहे. गणेशोत्सव साजरा करताना आम्ही पर्यावरणाचंही तितकंच भान ठेवलंय. सजावटीचा फारसा झगमगाट कधीच नसतो. त्यामुळे बाप्पाचं स्वागत आमच्याकडे वाजतगाजत होत नसलं तरी आनंदाने आणि प्रसन्नतेने होतं. कारण मनापासून आणि श्रद्धेने त्याचं आदरातिथ्य केलं तरी ते धूमधडाक्यात केल्यासारखंच असतं असं मला वाटतं. लोकांनी एकत्र जमावं, भेटावं हा मूळ उद्देश आमच्या घरी गणपतीच्या दिवसांत सफल होतो, याचा मला आनंद आहे.
स्वप्निल जोशी