चाहत्यांनी आपल्या आवडत्या सेलिब्रिटींचे मंदिर बांधल्याचे वृत्त आत्तापर्यंत तुम्ही अनेकवेळा वाचले असेल. परंतु, तमिळ अभिनेता आणि चित्रपटकर्ता राघव लॉरेन्स आपल्या आईच्या स्मरणार्थ मंदिराची उभारणी करीत आहे. तामिळनाडूतील पूविरुंधावली या आपल्या वडिलांच्या गावी राघव या मंदिराची उभारणी करीत आहे. मंदिराचे बांघकाम सुरू झाले असून, पुढील वर्षी हे मंदिर पूर्ण हेईल. याविषयी वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला, माझी आई कनमणी हयात असतानाच तिचे मंदिर बांधण्याचे स्वप्न मी पाहात होतो. आपल्या मुलांसाठी आयुष्य वेचणाऱ्या सर्व मातांना हे मंदिर समर्पित करीत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. आपल्या आईचा पुतळा राजस्थानमध्ये बनविण्यात आला असून, पुढील वर्षी एका भव्य समारंभात या मंदिराचे अनावरण करणार असल्याची माहिती त्याने दिली. अनेक खस्ता काढत आपले संगोपन करणाऱ्या आईने आपल्याला कसे वाढविले, याची हृदयद्रावक कथा सांगणारे पुस्तक लिहिण्याचा विचारदेखील लॉरेन्स करीत आहे.