‘देख भाई देख’ मालिकेने जेव्हा छोटा पडदा गाजवला होता तेव्हा ‘तो’ डोळ्यात काजळ घालून, अंगावर फडके टाकून फिरणारा नोकर ‘करिमा’ म्हणून नावारूपाला आला होता. मध्यंतरीच्या काळात ‘जो जीता वही सिकंदर’मध्ये आमिर खानच्या मित्रापासून अनेक हिंदी चित्रपटांत नायकाचा मित्र म्हणून त्याने काम केले होते. त्यानंतर ‘ऑफिस ऑफिस’ मालिकेतला ‘पटेल’ आणि मग ‘बा, बहू और बेबी’ या शोमधून अभिनेता देवेन भोजानीला ‘गट्टू’ ही ओळख कायमची चिकटली. पण, या एवढय़ा प्रवासात अभिनेता ते दिग्दर्शक देवेन भोजानी असे त्याचे स्थित्यंतर झाले होते. गेल्या वर्षी ‘पुकार’सारखी अ‍ॅक्शनपट शोभावी अशी मालिका दिग्दर्शित केल्यानंतर देवेन या वेळी अमेरिकन शोचे रूपांतर असलेला ‘सुमीत संभाल लेगा’ हा नवा शो घेऊन येत आहे.
‘एव्हरीबडी लव्हज् रेमंड’ या अमेरिकन शोचा भारतीय अवतार ‘सुमित संभाल लेगा’ या नावाने छोटय़ा पडद्यावर येत आहे. एका अमेरिकन शोचे रीतसर कॉपीराइट हक्क घेऊन या शोची निर्मिती केली जाते आहे. त्यामुळे, निर्मितीपासून ते दिग्दर्शनापर्यंत प्रत्येक गोष्टीत पाश्चिमात्य मांडणीचा प्रभाव जाणवेल, अशी माहिती दिग्दर्शक देवेन भोजानी यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना दिली. ‘सुमित संभाल लेगा’ हा अमेरिकन शोच्या संकल्पनेवर आधारित असल्याने मूळ मालिकेच्या हॉलीवूड टीमबरोबर दररोज एकत्र काम करावे लागते. मालिकेची संकल्पना इथे कशी असेल इथपासून ते दर दिवशीच्या भागाचे कथानक कसे असेल, याबद्दल त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जातो. त्यांचेच तंत्रज्ञ इथेही काम करत असल्याने मालिकेत कॅ मेऱ्याचे अँगल्सही पहिल्यांदाच वेगळे पाहायला मिळतील. पूर्णत: हॉलीवूडच्या टीमबरोबर एकत्र काम करून केली जाणारी ही पहिली भारतीय मालिका ठरेल, असा विश्वासही देवेन भोजानी यांनी व्यक्त केला.
विनोदी अभिनेता ते दिग्दर्शक हा देवेनचा प्रवास तसा अपघातानेच घडला असला तरी दिग्दर्शनाची गोडी वाढत गेल्यानंतर आपण लॉस एंजेलिसमध्ये जाऊन फिल्ममेकिंगचे रीतसर प्रशिक्षण घेतले आणि मग पुन्हा कामाला सुरुवात के ल्याचे देवेन यांनी सांगितले. ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘खिचडी’ या मालिकांचे दिग्दर्शन केल्यानंतर ‘बा, बहू और बेबी’ या मालिकेत दिग्दर्शक आणि गट्टूची भूमिका अशी दुहेरी कसरत देवेन यांनी पेलली. सलग पाच वर्षे सर्वाधिक टीआरपी राखणाऱ्या या मालिकेत नंतर आपण अडकून पडत चाललो आहोत, अशी भावना निर्माण झाली होती. काहीतरी नवीन करायला हवे, या विचाराने मी ‘युनिव्हर्सिटी ऑफ साऊदर्न कॅ लिफोर्निया’मध्ये चित्रपट दिग्दर्शनाच्या प्रशिक्षणासाठी दाखल झालो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मग ‘पुकार’सारखी पहिली अ‍ॅक्शन मालिका आणि आता ‘सुमित संभाल लेगा’ ही अमेरिकन शोच्या धर्तीवरची मालिका दिग्दर्शक म्हणून आपल्याला नवे काही क रून पाहण्याची संधी या मालिकांनी दिली असल्याचे देवेनचे म्हणणे आहे.
जाहिराती, थिएटर ते चित्रपट सगळीकडेच आपली चमक दाखवणारा अभिनेता नमित दास हा या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्याच्या निवडीने अर्धी लढाई आधीच जिंकली असल्याचे देवेन सांगतो. या मालिकेचे भागही आधीच तयार असल्याने इतर मालिकांच्या सेटवर दिसतो तसा घिसाडघाईचा प्रकार आपल्या सेटवर नाही. ही मालिका पूर्ण करतानाच देवेनने आपल्या पहिल्यावहिल्या दिग्दर्शकीय सिनेमाची तयारीही सुरू केली आहे. सध्या पटकथेवर काम सुरू असून मालिकेचे काम झाल्यानंतर विपुल शहा निर्मित चित्रपटाची तयारी सुरू होईल, असे त्याने सांगितले.