गेल्या काही काळात स्त्री-पुरुष संबंधांतले चिरंतन तिढे पुन: पुन्हा मराठी नाटकांत सामोरे येत आहेत. वीरेंद्र प्रधान लिखित-दिग्दर्शित ‘कुमुद प्रभाकर आपटे’, मिलद बोकील यांच्या कथेवरील चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित ‘समुद्र’ आणि आता महेश घाटपांडे लिखित व राजन ताम्हाणे दिग्दर्शित ‘ग्रेसफुल’ या तिन्ही नाटकांमध्ये स्त्री-पुरुष संबंधांतील तिढेच केन्द्रस्थानी आहेत. अशा संबंधांत पूर्वी कुणा एकाला खलनायक/नायिका ठरवून अनैतिकतेचे खापर त्याच्या माथी फोडले जाई आणि शिक्षेस पात्र ठरविले जाई. म्हणजे मग प्रेक्षकही न्याय झाल्याच्या समाधानात घरी जायला मोकळे; आणि वर सामाजिक नीतिसंकेतही अबाधित राहात! पण आता काळ बदलला आहे. नीती-अनीतीचे प्रचलित संकेत धाब्यावर बसवून आपल्याला हवं तसं आयुष्य जगण्याकडे मनुष्याचा कल वाढला आहे. स्त्रियाही त्यास अपवाद नाहीत. अर्थात् पूर्वीच्या काळीही समाजमान्य नीतीचौकटी झुगारणारी माणसं नव्हती असं नाही; परंतु ती सामाजिक दबावाला थोडी बिचकून असत. जी मंडळी सामाजिकदृष्टय़ा वरच्या थरात असत, त्यांचा प्रश्नच नव्हता. ती स्त्री-पुरुष संबंधांतलं सोवळेपण झुगारून देत. त्याबद्दल त्यांना जाब विचारण्याची कुणाची शामत नसे. पण अशी माणसं अपवाद. कारण तेव्हा एकूणच समाज चाकोरीबद्ध जगणारा होता. आज जागतिकीकरणाच्या खुल्या वातावरणात सर्वार्थाने मुक्तीचे वारे आपल्याकडे वाहू लागले आहेत. परिणामी स्त्री-पुरुष संबंधांतही खुलेपणा आला आहे. याचीच परिणती म्हणजे स्त्री-पुरुषांचे एका वेळी अनेकांत गुंतण्याचे प्रमाण वाढते आहे. आणि त्याबद्दल अपराधीभावही त्यांना वाटेनासा झाला आहे. या संबंधांचे समर्थन करण्यापर्यंत त्यांची भीड चेपली आहे. उपरोल्लेखित तीन नाटकं ही आजच्या या वातावरणाचं अपत्य आहेत यात शंका नाही. आज विवाहबाह्य़ संबंधांत गुंतलेल्या पुरुष वा स्त्रीला आपलं काही चुकतं आहे असं बिलकूल वाटत नाही. ‘मला अमुक एक आवडला/ आवडली, मग तो/ ती विवाहित आहे वा नाही याच्याशी मला  घेणदेणं नाही, आणि यात मी काही गैर करतो आहे असंही मला वाटत नाही..’ इतकी त्यांची स्वच्छ भूमिका असते. आपल्या संबंधांतून कुणी दुखावलं जाईल, कुणा व्यक्तीचं/ कुटुंबाचं नुकसान होईल, व्यक्तिगत-सामाजिक समस्या उद्भवतील, वगैरेची त्यांना फिकीर नसते. समजा- उद्भवल्याच काही समस्या.. तर त्यांना कसं सामोरं जायचं हे आमचं आम्ही ठरवू.. असं त्यांचं म्हणणं असतं.अशा संबंधांकडे बाहेरून पाहणाऱ्यांनाच नीतीकल्पनांचा बागुलबुवा वाटत असतो. प्रत्यक्षात त्यात गुंतलेल्यांना यात काही वावगं वाटत नसतं. खरं तर आता फिरून आपण आदिम प्रेरणांकडे निघालो आहोत, हाच याचा अर्थ! आदिमानव स्वरूपात जगताना स्त्री-पुरुषांतील नैसर्गिक आकर्षण हेच त्यांच्या एकत्र येण्याचं कारण असे. त्याकाळी नीती-अनीतीच्या कल्पनांचा जन्म झाला नव्हता. पुढे माणसाला कुटुंबसंस्थेची गरज भासू लागली आणि ती टिकवण्यासाठी नीती-अनीती वगैरे सामाजिक बंधनांचा जन्म झाला. या बंधनांमुळे मानवाचा प्रगल्भतेच्या दिशेनं प्रवास झाला असला तरी तो नैसर्गिक खचितच नव्हता. त्याच्या उपजत प्रेरणांवरील ही बंधनं त्याला नेहमीच जाचक वाटत आली आहेत. परंतु त्याने ती स्वत:हूनच स्वीकारलेली असल्यानं आणि त्याचे फायदेही दिसून आल्याने त्याला ती मोडणं चुकीचं वाटत आलेलं आहे. मात्र, आज त्याला ती फारच त्रासदायी वाटू लागली आहेत. आपल्या नैसर्गिक प्रेरणा दाबून जगणं त्याला आता मान्य नाही. मग त्याची काहीही किंमत चुकवावी का लागेना.त्यामुळे आता प्रश्न उरतो तो इतकाच, की या वास्तवाला आपण मोकळ्या मनानं, खुल्या दृष्टीनं सामोरं जाणार आहोत की नाही? अर्थात तेही आता आपल्या हाती उरलेलं नाही. तुम्ही स्वीकारा वा नाकारा; प्राप्त परिस्थितीत काहीही बदल होणार नाही.
तर आता ‘ग्रेसफुल’ या नाटकाकडे वळूया.
यात आभा या मध्यमवयीन प्राध्यापक स्त्रीचा नाटककार नवरा देव हा वेदा नामक एका तरुण अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला आहे. आपल्या बायकोला याची खबर नाही अशी त्याची समजूत आहे. (त्याला आपला सुखी संसार मोडायचा नाहीए. आणि वेदावरही त्याचं जीवापाड प्रेम आहे. तिला तो गमावू इच्छित नाही.) आभानंही देवची ही समजूत कायम राहील अशी खबरदारी घेतली आहे. त्यामुळे ती वेदाशी खेळीमेळीने वागते-बोलते..
पण एके दिवशी देव काही कामानिमित्त दुबईला जातो आणि त्याला निरोप द्यायला म्हणून वेदा व आभा विमानतळावर जातात. परतताना आभा वेदाला आपल्या घरी घेऊन येते. सहज बोलण्याच्या ओघात तिची खोदून चौकशी करता करता ती तिच्या आणि देवच्या नात्याबद्दल आपल्याला सारं काही माहीत असल्याचं तिला सांगते आणि याउप्पर तिनं देवचा नाद सोडून द्यावा असं खडसावून बजावते. मात्र, वेदा त्यास साफ नकार देते. आपलं देववर आणि त्याचंही आपल्यावर जीवापाड प्रेम आहे, तेव्हा त्याला सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असं ती आभाला स्पष्ट सांगते. परंतु आभा हट्टालाच पेटते.. देवचा नाद सोड म्हणून!
या दोघींतला भावनिक आणि मानसिक संघर्ष हा ‘ग्रेसफुल’चा विषय आहे. लेखक महेश घाटपांडे यांनी या नाटकाचा घाट घातलाय तो काही एका हेतूनंच. या प्रकरणात देव, आभा आणि वेदा यांच्यापैकी कुणाचंच काही चुकलेलं नाही; परंतु त्यांच्या बाबतीत स्त्री-पुरुष संबंधांतला जीवघेणा गुंता झालाय, हे खरं- एवढंच लेखकाला यात मांडायचं आहे. या संबंधांचा नैतिकतेच्या न्यायासनावर बसून न्यायनिवाडा करता येणार नाही- आणि तसा तो कुणी करूही नये, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते बरोबरच आहे. कारण स्त्री-पुरुष संबंध ही एक अत्यंत तरल, नाजूक आणि गुंतागुंतीची गोष्ट असते. त्याकडे कोण कशा नजरेनं पाहतो त्यानुरूप त्याला ते दिसत असतात. अशा संबंधांत अडकलेल्यांची आपली म्हणून एक बाजू असते. ती चूक की बरोबर, नैतिक की अनैतिक.. ठरवणं अवघड. सामाजिक दृष्टिकोनातून त्याचं एक वेगळं मूल्यमापन होऊ शकतं. तर व्यक्तिगत पातळीवर त्यात अनेक कंगोरे असू शकतात. असतातही. त्यामुळे अशा संबंधांचा कुणा त्रयस्थाला न्यायनिवाडा करता येणं कठीणच. एक खरंय, की अशा संबंधांत गुंतलेल्यांची भावनिक, मानसिक आणि अन्यही फरफट अपरिहार्य ठरते. तशी ती होतेही. याला कुणाचाच इलाज नसतो.. हेच ‘ग्रेसफुल’मध्ये मांडलेलं आहे. मात्र, अशा संबंधांत आतडं पिळवटणारे संघर्षांचे असंख्य कंगोरे असतात; जे या नाटकात आलेले नाहीत. परिणामी नाटक एके ठिकाणीच घुटमळत राहतं. या संबंधांचा ‘ग्रेसफुल’ स्वीकारापर्यंतचा या दोघींचा प्रवास त्यातल्या खाचखळग्यांसह येता तर नाटक अधिक उंचीवर गेलं असतं. दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी त्यादृष्टीनं निश्चितच प्रयत्न केले आहेत; परंतु ते कमी पडलेत. त्यात त्यांनी आभाला काहीसं आक्रस्ताळं रूप दिल्यानं ती सहानुभूती गमावते. नवरा दुरावलेली स्त्री अशीच वागणार, हे खरं असलं तरी आभा ही काही सर्वसामान्य स्त्री नाही. ती प्राध्यापिका आहे. संतसाहित्याचा तिचा अभ्यास आहे. त्यामुळे या सगळ्याकडे ती अधिक समतोल नजरेनं नक्कीच पाहू शकते. या पाश्र्वभूमीवर वेदा ही अधिक परिपक्व अन् प्रगल्भ उतरली आहे. सुरुवातीला ती उच्छृंखल तर नाही ना, अशी आशंका येत असली तरी पुढे तिचं वास्तव रूप आकळत जातं. पठारी प्रदेशातून वाहणाऱ्या शांत, धीरगंभीर नदीचं समंजसपण तिच्यात दिसतं. झोकून देणाऱ्या तिच्या प्रपाती उगमाचीही कल्पना आपण करू शकतो. नव्हे, ते झेपावलेपण तिच्यात आहेच. म्हणूनच देवपासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्यावर ती ज्या असोशीनं त्याच्या कोटाला कवटाळते त्यातून तिचं हेच रूप नितळपणे जाणवून जातं. पहिल्या अंकाच्या शेवटी तिचं फिल्मी गाणं म्हणणं मात्र काहीसं खटकतं. तिच्या प्रगल्भतेला ते शोभणारं नाही. असो. लेखक-दिग्दर्शकानं या विषयाच्या आणखीनही अव्यक्त मिती धुंडाळल्या असत्या तर नाटक अधिक सखोल झालं असतं.आशा शेलार यांनी आभाची तगमग, तिचा त्रागा, वेदना आणि हिस्टेरिक होण्यापर्यंतची सैरभैर मन:स्थिती नेमकेपणी टिपली आहे. परंतु हे करत असताना ही स्त्री उच्चशिक्षित आहे, संतसाहित्याची अभ्यासक आहे, ही गोष्ट त्यांनी  ध्यानी घेतली असती तर त्यांचा उद्रेक काहीसा संयमित झाला असता आणि त्यांच्या व्यक्तिरेखेलाही तो पोषक ठरता. मालिकेतील त्यांच्या एका खाष्ट भूमिकेचा तर हा परिणाम नव्हे? असो. अदिती सारंगधर यांना मात्र वेदाचा आत्मा सापडला आहे. तिचं देववरचं उत्कट, तितकंच डोळस प्रेम, त्यातलं तिचं आकंठ बुडून जाणं, आपल्या शाश्वत प्रेमावरील नितांत विश्वास आणि त्यातून आलेलं सच्चं निर्भयपण या साऱ्या भावछटा त्यांनी विलक्षण ताकदीनं दाखवल्या आहेत. त्यांच्यातल्या प्रगल्भ अभिनेत्रीचं त्यातून दर्शन घडतं. नाटकाची तांत्रिक अंगे यथायोग्य आहेत.