‘नया है वह.. ’, दगडू आणि प्राजू, दगडूच्या तोंडून येणारा आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ हा संवाद, प्राजूने वडिलांच्या भीतीने अगदी सरळ रेषेत म्हटलेलं ‘चला हवा येऊ द्या..’  अशा कितीतरी गोष्टी गेले वर्षभर प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. पहिलं प्रेम टाइमपास असतं का?, याचं उत्तर कदाचित कोणीही ठामपणे देऊ शकलं नसेल. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने प्रत्येकानेच आपल्या पहिल्या प्रेमाची गोष्टी पुन:पुन्हा पडताळून पाहिली असेल हे नक्की. दीड वर्ष उलटून गेलं आहे ‘टीपी’ प्रदर्शित होऊन. आणि तरीही झाडाच्या मागे लपून प्राजू आणि लेले कुटुंबाचं घर सोडून जाणाऱ्या दगडूची नजर प्रेक्षकांच्या मनात अशीच अडकली आहे. त्यांच्या मनातील दगडू आणि प्राजूची पुढची गोष्ट काय? हा प्रश्न १ मेला ‘टाइमपास २’ प्रदर्शित होईल तेव्हा सुटेल. वर्षभर प्रेक्षकांच्या मनात अडकलेली गोष्ट सोडवायला दिग्दर्शक रवी जाधव आणि टीमने भराभर काम केलं आहे. त्यामुळे, दीड वर्षांच्या आतच दुसरी कथा ‘टाइमपास २’ म्हणून समोर येणार असली तरी ‘टीपी’ ते ‘टीपी २’ हा या टीमचा प्रवास कसा होता? काय घडलं या दरम्यान.. ‘टीपी’ने त्यांच्या जीवनात झालेला परिणाम अशा एक ना अनेक गोष्टींवर ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात या टीमबरोबर  रंगलेल्या गप्पा..rv04नाव ‘टाइमपास’ का?’

प्रिया बापट
एखादी गोष्ट ‘टाइमपास’ म्हणून किंवा छंद म्हणून सुरू करतो आणि त्यातलं गांभीर्य आपल्याला हळूहळू कळायला लागतं. आपण त्याच्यात खोल खोल गुंतत जातो. म्हणजे जसं मी ‘टाइमपास’ म्हणून गाणं सुरू के लं आणि नंतर त्याचा पाठपुरावा करावा, असं मला वाटलं. मला वाटतं प्रेम ही अशीच गोष्ट असते. कळत-नकळत त्याची सुरुवात होते. आणि मग आपण हळूहळू त्यात ओढले जातो, प्रेमाची व्याप्ती आपल्याला कळायला लागते. म्हणून कदाचित प्रेमकथा असूनही हे नाव ‘टाइमपास’ असू शकेल.

रवी जाधव
मुलं प्रत्येक गोष्ट टाइमपास म्हणून करतात. म्हणजे मी मुलाला तबला शिकायला सांगितलं तर तो म्हणतो टाइमपास आहे ना. क्रिकेट शिकायला जा. टाइमपास आहे ना.. तसंच मग ते टाइमपास म्हणून प्रेम करायला लागतात. पण, असं व्हायला नको. प्रत्येक गोष्ट ही टाइमपास नसते. जसं शिक्षणाचा एक बेस असतो,  त्या पद्धतीनेच पुढे जावं लागतं. तसंच या चित्रपटात अगदी स्पष्टपणे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की प्रेम हे टाइमपास नाही आहे. त्यामुळे चित्रपटाचं नाव ‘टाइमपास’ होतं. सिक्वलसाठीही ‘टाइमपास’ हे नाव बदललं नाही कारण, खूप गोष्टी या पहिल्या चित्रपटाशी जोडलेल्या आहेत. बऱ्याचदा सिक्वल्स असे असतात ज्याचा पहिल्या सिनेमाशी काही संबंध नसतो. इथे जबाबदारी वेगळी होती कारण पहिल्या चित्रपटातील व्यक्तिरेखा लोकांच्या मनात इतक्या रुजलेल्या होत्या. त्यांना बरोबर घेऊनच पुढचा भाग करायचा होता म्हणजे टू पण नको. मला ‘टाइमपास’ हेच नाव चाललं असतं. तोच सिनेमा, तीच गोष्ट पुढे जाते आहे म्हणून ‘टाइमपास २’.

‘नया है वह’ ची जादू  
माझ्या आयुष्यात हा संवादच ‘नया है वह’ आहे. नटाला जी लोकप्रियता लागते ती या संवादाने मिळवून दिली. सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीने हा संवाद पसरला. त्याच्यावरचे विनोद तयार झाले. कुठल्याही बाबतीत ‘नया है वह’ म्हणण्याची पद्धत रूढ झाली. ऑफिसेसमध्ये कोणाचे काही चुकले तर अरे नया है वह.. जाने दो असे संवाद झडायला लागले. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीश कुमार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी या सगळ्यांच्या तोंडी हा संवाद होता. ज्या पद्धतीने लोकांनी हा संवाद स्वीकारला. त्याच्यावर प्रेम के लं. आणि यानिमित्ताने त्यांच्याही आयुष्यात असे काही नया है वह क्षण आले असतीलच ना ते त्यांनी अनुभवले. मला वाटतं हा अनुभव वेगळा होता आणि नट म्हणून मला सुखावणारा अनुभव होता.
वैभव मांगले

पहिलं प्रेम टाइमपास होतं का?
‘टाइमपास’ चित्रपटाचे निर्माते ‘एस्सेल व्हिजन’चे व्यवसायप्रमुख निखिल साने, दिग्दर्शक रवी जाधव, नवा ‘दगडू’ प्रियदर्शन जाधव आणि ‘शाकाल’ ऊर्फ ‘लेले’ ऊर्फ वैभव मांगले यांनाच विचारलेल्या या प्रश्नाची ही गंमतीदार उत्तरं.. खरंच, ‘नया है यह.’

रवी जाधव
पहिलं प्रेम टाइमपास होतं. पहिलं प्रेम चौथीत असताना झालं होतं. आमच्या वर्गात एक मुलगी होती ती मला आवडायची. पण, चौथीनंतर शाळा बदलते. बालविकास मंदिर शाळा होती. पाचवीत मग शाळा बदलली. मी मुलांच्या शाळेत गेलो. मुलीही मुलींच्याच शाळेत गेल्या असतील. बाजूच्याच लेनमध्ये शाळा होती. पण, त्यावेळी ते टाइमपास होतं की माहीत नाही. त्यावेळी तशी काही व्याख्याच नव्हती.

वैभव मांगले
पहिलं प्रेम हे दहावीत झालं. दहावी ‘अ’च्या वर्गात एक सुंदर मुलगी होती. सगळा वर्ग तिच्या पाठी होता. पण, मला नेहमीच दोन पर्याय ठेवायची सवय आहे. मला माहिती होतं की माझ्यापुढे खूप मुलं आहेत जी तिला आवडू शकतात. त्यामुळे ती नाही पण, त्या मुलीची एक मैत्रीण होती जिचं नाव पवार होतं तर ती आपल्याला आवडू शकते, असा एक पर्याय मी शोधला होता. पण, पुढे त्या प्रेमाचं काहीच झालं नाही. पुढे मग वर्ष बदलतात तशी अकरावी, बारावी असं दरवर्षी घडत गेलं.. आपण फक्त प्रेम करत राहायचं आणि प्रत्येक वेळी मी दोन पर्याय ठेवले होते हे विशेष..

प्रियदर्शन जाधव
पहिलं प्रेम हे अजिबात टाइमपास नव्हतं. शाळेतलंच अफेअर होतं आणि अगदी गंभीर होतं. पण, झाल्या.. गोष्टी बदलत गेल्या. ती पुढे निघून गेली. मी पुढे निघून आलो पण, ते टाइमपास नव्हतं..
दिग्दर्शकाचं तात्पर्य – मला वाटतं ‘टाइमपास’चं हेच यश आहे कारण, पहिलं प्रेम कोणाचं मस्करी असतं असं वाटत नाही. अर्थात, वैभवसारखा पर्याय दुसरा वाटतो तेव्हा ते नक्कीच टाइमपास असतं. पण, लोकांना विचाराल तर ते गंभीरच असतं. पहिल्या प्रेमाच्या आठवणी या आयुष्यभर माणसाच्या लक्षात राहतात. त्यामुळेच ‘टाइमपास’शी प्रत्येक वयातील माणसं जोडली गेली.

निखिल साने
आयुष्यातील खरं प्रेम म्हणजे पत्रकारिता. एक्स्प्रेस टॉवरच्या पायऱ्या चढत असतानाच ही जुनी आठवण ताजी झाली. पुण्यात सिम्बॉयसिसमधून पत्रकारितेत पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर एक्स्प्रेसमध्ये मी तीन महिने इंटर्नशीप केली होती. त्यामुळे आयुष्यातील पहिलं प्रेम हे टाइमपास नसतं. म्हणजे मी पत्रकारित सोडली कारण त्या रात्रीच्या डय़ुटीज वगैरे या गोष्टी काही मला जमल्या नाहीत. त्यावेळी मला टीव्ही करायचा होता. पण, ब्रेक मिळाला नाही मग मी ‘सुरभी’ वगैरे केलं. पण, तुमच्या पहिल्या प्रेमाची जी मुळं आहेत ती जाणवत राहतात. मग ते ‘नटरंग’ करताना असेल. ‘फँड्री’ किंवा ‘एलिझाबेथ एकादशी’ करताना असेल त्या सगळ्यात पुन्हा एका वेगळ्या पद्धतीने गुंतत जातात. म्हणजे केवळ ग्लॅमर किंवा चित्रपट म्हणून त्याच्याशी तुम्ही जोडलेले राहत नाहीत. तर त्यामागचे सामाजिक घटक, त्याचे परिणाम या सगळ्याचा तुम्ही विचार करता. त्या अर्थाने, पहिलं प्रेम अयशस्वी ठरलं असेल पण, त्याचा फायदा पुढच्या वाटचालीतही होतो आहे.

प्रिया बापट ते ‘प्राजू’
प्राजक्ता साकारताना मला थोडं शांत रहावं लागलं. के तकीचा मूळ स्वभावच शांत आहे. पण, माझा स्वभाव rv02अजिबात शांत नाही. त्यामुळे एकदा ऑफ स्क्रीन मी त्याची तयारी केल्यानंतर ऑन स्क्रीन फारशी अडचण येत नाही. पटकथा लिहिताना दिग्दर्शक म्हणून रविने इतकी सुंदर मांडणी केली होती की केतकीने असं केलं आहे म्हणून तु तसं कर, असं त्याने कधीच सांगितलं नाही. त्याला ते फार स्वतंत्रपणे मांडायचं होतं आणि त्याने आम्हालाही ते स्वातंत्र्य दिलं की पंधरा वर्षांचा काळ गेला आहे. यादरम्यान, माणूस खूप बदलू शकतो आणि त्याचं उलटंपालटं काहीही होऊ शक तं. त्यामुळे या काळात त्यांचा निरागणपणा आणि त्यांची स्वाभाविकता कायम ठेवा, एवढाच त्याचा आग्रह होता, त्यामुळे पटकथेनुसार जे बदल हवे होते ते स्वीकारून भूमिका साकारण्याचा आम्ही प्रयत्न केला.

प्रियदर्शन ते ‘दगडू’ व्हाया प्रथमेश
कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रियदर्शन जाधवला ‘फु बाई फु ’ने एक ओळख मिळवून दिली. प्रियदर्शन आणि रवी हे पहिल्याच ‘टाइमपास’च्या निमित्ताने एकत्र आले ते चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी. आज प्रियदर्शन ‘टाइमपास २’चा ‘हिरो’ आहे..rv03
पहिल्या ‘टाइमपास’चे चित्रीकरण सुरू होण्याआधी रवीने प्रथमेश, त्याचे तीन मित्र, केतकी यांना एकत्र बोलावलं होतं. त्यांना एकत्र आणून आम्ही त्यांना दृश्य वाचायला लावायचो आणि मग ते बाजूला ठेवून वैयक्तिक आयुष्यातले संदर्भ जोडायला लावायचो. त्यावेळी प्रथमेश आणि त्या तिघांना समजावून सांगताना काय पद्धतीने ते यायला पाहिजे हे दाखवायचो. कधी क धी प्रथमेशला दगडू स्टाइलने ते उभं राहून करून दाखवायचो. या सगळ्या गोष्टी रवीने पाहिल्या आणि तो त्या वेळी म्हणालासुद्धा ‘टीपी २’ करायचा झालाच तर तू दगडू कर. मला पहिल्यांदा विश्वासच बसला नाही..मी अनेक महिने त्याला विचारत होतो. आणि यासाठी प्रथमेशला धन्यवाद. कारण, तो काळा आहे, बारीक आहे. ते फार गरजेचं होतं. ते नसतं तर मला ही भूमिका मिळाली नसती.

‘दगडू ’ सापडला
दगडू आपल्या आसपासच आहे. मी कॉलेजमध्ये असे अनेक मित्र पाहिलेले आहेत. मी रूपारेलला होतो. लालबाग, शिवडी, परळ या भागांत राहणारी जी मुलं आहेत ती असंच बोलतात. प्रथमदर्शनी त्यांना पाहिल्यावर काय यांची भाषा आहे, काय भाई असल्यासारखे वागतात, आहे तर एवढा कडका आणि आवाज किती करतो आहे.. प्रथमदर्शनी ते तसे वाटतात. पण, ते तसे नसतात. ‘प्यापर गळपटला’, ‘बस्तीमध्ये मस्ती नाय’सारखे संवाद मला सापडले, कारण मी या मुलांमध्ये राहिलो आहे. माझा एक प्रसाद नावाचा मित्र होता. त्याला आम्ही भोंग्या म्हणायचो. कारण, त्याचा सर्वसाधारण आवाजही तितकाच मोठा असायचा. तो असंच बोलायचा पण, आज तो एक यशस्वी माणूस आहे. त्यामुळे भाषा कशीही असली तरी त्याने काही फरक पडत नाही. मला वाटतं सगळ्यांच्या आसपास म्हणजे पुण्या-मुंबईतच नाही तर मी कोल्हापूरचा आहे तिथेही असे अनेक दगडू असतात. आणि त्या सगळ्या दगडूंनी या ‘दगडू’ला आपलंसं केलं. शेवटी तो समाजाचाच एक भाग आहे जो आम्ही चित्रपटात थोडं थोडं करत पेरत गेलो.
-प्रियदर्शन जाधव    

संकलन – रेश्मा राईकवार