वर्षभर कामानिमित्ताने जगाच्या पाठीवर कुठेही गेलेल्या भारतीयाला दिवाळीत मात्र घरी येण्याची आस लागते. आपण कितीही कमावत असलो, तरी वडीलांनी दिवाळीला दिलेले कपडे, आईच्या हातचा फराळ, भावाची ओवाळणी यांची सर कशालाच नसते. दूरचित्रवाहिनीवरच्या कलाकारांनाही दिवाळीच्यानिमित्ताने आपल्या घराची आणि घरातल्यांची ओढ लागली आहे.
मुंबईच्या मायानगरीत आपले नशीब आजमावायला दिल्ली, बंगळुरू, कोलकता, पंजाब अशा देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले दूरचित्रवाहिनी कलाकार वर्षभर दिवस-रात्र चित्रीकरणामध्ये व्यस्त असतात, पण दिवाळीत मात्र आम्हालाही घरी जाण्याची ओढ लागते, असे ते सांगतात.
‘स्टार प्लस’वरील ‘ये है मोहब्बते’ मालिकेतील इशिता सांगते की, दिवाळीच्या दिवसांमध्ये मी मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये माझ्या वडिलांसोबत दिवे आणि मिठाई वाटत असे, कामानिमित्ताने मुंबईला आल्यावरही मी दर दिवाळीला मित्रमैत्रिणींना भेटवस्तू देण्याचा माझ्या वडीलांचा शिरस्ता काही मोडला नाही.’
तिचाच सहकलाकार करण पटेलही तिच्या या विधानाला दुजोरा देत सांगतो की, ‘आम्ही गुजराती असल्यामुळे लक्ष्मीपूजन हा दिवस आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. या दिवशी कामानिमित्ताने घराबाहेर गेलेला प्रत्येकजण घरी परत येतो आणि आनंदाने तो दिवस साजरा करतो. मीही माझ्यापरीने दरवेळी हा नियम पाळण्याचा प्रयत्न करतो.’
या दोघांशिवाय विशाल सिंग आणि नलिनी नेगीसुद्धा दरवर्षी आपल्या घरी जातात किंवा घरच्यांना मुंबईला यायला सांगतात. शिविन नारंग सांगतो की, मी मूळ दिल्लीचा असल्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये इतर काही नाही पण दिल्लीच्या जेवणाची मला खूप आठवण येते. पण चित्रीकरणामुळे मला तिथे जाता येणार नाही, याचे दु:ख आहे. श्रद्धा मुसळेसुद्धा ‘चित्रीकरणामुळे मला दिवाळीमध्ये घरी जाता आले नाही, तरी भाऊबीजेला मी अहमदाबादला जाऊन भावाची ओवाळणी करणार आहे,’ असे सांगते.
पण यंदाही दिवाळीत ज्या कलाकारांना घरी जाता येणार नाही, त्यांनी मुंबईमध्ये आपल्या सहकलाकारांसोबत दिवाळी साजरी करायचे ठरवले आहे. अर्थात पर्यावरणाचे भान जपूनच दिवाळी साजरी करण्यावर बहुतेक सर्वाचाच भर आहे.
दिवाळीच्या दिवसांत शक्यतो फटाक्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अनेक कलाकारांचे म्हणणे आहे. ‘लहानपणी माझ्यासाठी दिवाळीचा अर्थ नवीन कपडे आणि फटाके हाच होता, पण आता लक्षात येत की,  दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे प्रचंड प्रदूषण होते त्यामुळे गेली कित्येक वर्ष मी दिवाळीमध्ये फटाके  उडवत नाही,’ असे महाराणा प्रतापची भूमिका साकारणारा शरद मल्होत्रा सांगतो.
‘हम है ना’मधील कन्वर धिलोन सांगतो की, ‘मला फटाके उडवणे कधीच आवडत नसे, त्यामुळे दिवाळीमध्ये मी कधीच फटाके उडवत नाही.’ ‘इतनी सी खुशी’मधील स्मृती कलरासुद्धा दिवाळी पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरी करणार असल्याचे सांगते.