हिंदी चित्रपटसृष्टीत एक तप गाजवल्यानंतर एक पाऊल पुढे टाकत हॉलीवूडपटांकडे वळणारे अभिनेते-दिग्दर्शक आपल्याकडे फारच कमी आहेत. त्यातल्या त्यात नसीरुद्दीन शहा, अनुपम खेर आणि आता अमिताभ बच्चन, इरफान खान यांच्यापासून ते अली फझलसारख्या नव्या कलाकारांनी हॉलीवूडपटांचा मार्ग सहजी चोखाळला आहे; पण शेखर कपूर हे एकमेव नाव वगळता हॉलीवूडपट दिग्दर्शित करण्याचे आव्हान फोर कोणी स्वीकारलेले नाही. गेल्या वर्षी यशराज प्रॉडक्शनने ‘ग्रेस ऑफ मोनॅको’ या चित्रपटाची निर्मिती करत हॉलीवूडमध्ये पाऊल टाकले होते, तर या वर्षी विधू विनोद चोप्रा यांनी ‘ब्रोकन हॉर्सेस’ या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून हॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.
विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला हॉलीवूडपट ‘ब्रोकन हॉर्सेस’ तेथील जेम्स कॅमेरॉनसारख्या नामवंत दिग्दर्शकांच्या पसंतीस उतरला आहे. गेली तीन दशके  चोप्रा यांनी बॉलीवूडवर आधी दिग्दर्शक म्हणून आणि मग ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’, ‘थ्री इडियट्स’सारख्या चित्रपटांचे निर्माते म्हणून आपला वरचष्मा राखला आहे. ‘परिंदा’, ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘मिशन काश्मीर’सारखे चित्रपट देणाऱ्या विधू विनोद चोप्रा यांनी पहिल्यांदाच हॉलीवूडपटासाठी पटकथा लेखन, निर्माता आणि दिग्दर्शन अशा तिन्ही भूमिका पार पाडल्या आहेत.  
यूएस-मेक्सिको सीमेवरचे गँगवॉर हा ‘ब्रोकन हॉर्सेस’चा कथाविषय आहे. या थरारपटासाठी विधू विनोद चोप्रा यांनी ‘पीके’, ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाचे लेखक अभिजात जोशी यांच्याबरोबर कथा लिहिली आहे.

‘फॉक्स स्टार स्टुडिओ’ या चित्रपटाचे वितरण आणि विपणनाची जबाबदारी सांभाळत असून १० एप्रिल २०१५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, सध्या ‘अवतार’ फेम जेम्स कॅ मेरॉन आणि ‘ग्रॅव्हिटी’चे दिग्दर्शक अल्फान्सो क्युरेन यांच्यासारख्या काही मोजक्या हॉलीवूड दिग्दर्शकांनी ‘ब्रोकन हॉर्स’ पाहिला असून त्यांनी या चित्रपटाला कौतुकाची पावतीही दिली आहे.