दर्जेदार आशय असलेल्या चित्रपटांना सर्वतोपरी मदत मिळवून द्यावी, या उद्देशाने गेली सहा वर्षे ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (एनएफडीसी)च्या वतीने ‘फिल्म बजार’चे आयोजन करण्यात येते. यंदा गोव्यात झालेल्या या ‘फिल्म बजार’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते विधू विनोद चोप्रा, मनीष मुंद्रा यांच्यासारखी मंडळी चित्रपटांना अर्थसहाय्य करण्यासाठी पुढे आली आहे. यावर्षी एकूण चार चित्रपटांना अर्थसहाय्य देण्यात येणार असून ‘एनएफडीसी’चा ‘डेव्हलपमेंट अ‍ॅवॉर्ड’ मुस्तफा सरवार फारुकी निर्मित ‘नो लॅण्ड्स मॅन’ या चित्रपटाला देण्यात आला आहे. 

‘एनएफडीसी’ने यावर्षी आयोजित केलेल्या ‘फिल्म बजार’ला बॉलीवूडकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरवर्षी ‘फिल्म बजार’ अंतर्गत विविध विभागात निर्मिती अवस्थेत असलेल्या चांगल्या चित्रपटांमधील काही निवडक चित्रपट परीक्षकांच्या एका टीमकडून पाहिले जातात, संबंधित निर्माता-दिग्दर्शकांशी चर्चा करून मग त्या चित्रपटाची निवड करण्यात येते. चित्रपट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली मदत ‘एनएफडीसी’कडून केली जाते. ‘फिल्म बजार’ आणि त्यातील चित्रपट यांचा विचार करता निर्माता विधू विनोद चोप्रा यांनीही अर्थसहाय्य देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लेखक-दिग्दर्शक श्लोक शर्मा यांच्या ‘हरामखोर’ या चित्रपटाला विधू विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी संयुक्तरीत्या १० लाख रुपयांचे विनाव्याज कर्ज उपलब्ध करून दिले आहे. निर्माता मनीष मुंद्रा यांनीही रिंकू कालसे यांच्या ‘लव्ह ऑफ मॅन’ या चित्रपटाला १० लाख रुपये विनाव्याज कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
‘फिल्म बजार’च्या ‘को-प्रॉडक्शन’ विभागात ‘नो लॅण्ड्स मॅन’ या चित्रपटाला दहा लाख रुपये पुरस्कार, खुशबू रांका आणि विनय शुक्ला यांच्या ‘प्रपोझिशन फॉर रिव्हल्यूशन’ या अनुबोधपटाला ‘वर्क इन प्रोग्रेस’ विभागात पुरस्कार देण्यात आले आहेत. तर राम रेड्डी यांच्या ‘तिथी’ या चित्रपटासाठी कराव्या लागणाऱ्या व्हीएफएक्स कामाची जबाबदारी प्रसिद्ध ‘प्रसाद ईएफएक्स’ लॅबने उचलली आहे. अरुण कार्तिक यांच्या ‘द स्ट्रेंज के स ऑफ शिवा’ या चित्रपटालाही दहा लाख रुपये पुरस्कार म्हणून देण्यात आले आहेत.
‘फिल्म बजार’चे हे आठवे पर्व होते. भारतीय चित्रपट दिग्दर्शक, त्यांच्या कथाकल्पना यांना जागतिक दिग्दर्शकांच्या नजरेस आणून देत चित्रपटसृष्टीतील लोकांकडूनच मदत मिळवून द्यायची ही आमची कल्पना होती. यावर्षीचा प्रतिसाद पाहता चित्रपटसृष्टीतील नामांकित चित्रपटकर्मीनाही हा ‘फिल्म बजार’ महत्त्वाचा वाटतो आहे, याबद्दल ‘एनएफडीसी’च्या व्यवस्थापकीय संचालिका नीना लाथ गुप्ता यांनी आनंद व्यक्त केला आहे.