बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन ही रुपेरी पडद्यावरील आपल्या भूमिकांबाबत नेहमीच चोखंदळ असते. कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची भूमिका साकारणे हे नेहमीच आव्हान असते. कलाकार अशा भूमिकेच्या शोधात असतो. अभिनेत्री विद्या बालन हिने असेच एक आव्हान स्वीकारले आहे. अभिनेत्री सुचित्रा सेन यांची भूमिका ती साकारणार आहे.सुचित्रा सेन यांच्या नाती रायमा आणि रिया या दोघी जणी आपल्या आजीवर म्हणजेच सुचित्रा सेन यांच्यावर एक चित्रपट तयार करत आहेत. विद्या बालन हिला बंगाली संस्कृती आणि कोलकोताबद्दल विशेष आपुलकी आणि प्रेम आहे, हे तिने वेळोवेळी सांगितलेही आहे. त्यामुळे सुचित्रा सेन यांच्यावरील चित्रपटासाठी त्यांची भूमिका साकार करण्यासाठी विद्या बालनची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाबरोबरच विद्या बालन पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांच्या जीवनावर तयार होत असलेल्या ‘हमारी अधुरी कहॉंनी’ या चित्रपटात ‘बेनझीर भुत्तो’ यांची भूमिका साकारणार आहे. सुचित्रा सेन आणि बेनझीर भुत्तो या दोघींचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे भिन्न असे होते. त्यामुळे या दोघींच्या भूमिका साकारणे विद्या बालनसाठी नक्कीच आव्हान असणार आहे. हे आव्हान ती कशी पेलते याकडे तिच्या चाहत्यांचे आणि बॉलिवूडचेही लक्ष लागले आहे.