आपल्या विवाहाच्या बाबतीत विद्या बालन आणि सिध्दार्थ रॉय कपूर यांनी सुरूवातीपासून प्रसिध्दीमाध्यमांशी चालवलेला लपाछपीचा खेळ आज लग्नाची ऐन घटिका भरत येईपर्यंत सुरू होता. विद्याचा विवाह चेंबूरच्या समाज मंदिरात होणार असल्याचे काल सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात वांद्रे येथील ग्रीन माईल बंगल्यात दाक्षिणात्य विद्या आणि पंजाबी सिध्दार्थ रॉय कपूर यांच्या लग्नाची गोष्ट सुफळ संपूर्ण झाली.
ग्रीन माईल बंगल्यात वधू-वरांचे पालक आणि मोजके नातेवाईक यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडल्याचे सांगण्यात आले. एक तासभर हा विवाहसोहळा सुरू होता. विद्याने पारंपरिक कांजीवरम साडी तर सिध्दार्थने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. आपला विवाह सोहळा अत्यंत साधा आणि खासगी असावा, अशी या दोघांची इच्छा होती. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विवाह कुठे होणार, याबाबत दोन्ही कुटुंबीयांच्या वतीने गुप्तता पाळण्यात आली होती. बॉलिवूडमधील हे बहुचर्चित जोडपे आज पहाटे पावणेपाच वाजता चेंबूरच्या श्रीसुब्रमण्यम् समाज मंदिरात विवाहबध्द झाल्याचे आधी सांगण्यात येत होते. पण, नंतर मात्र वांद्रयातील ग्रीन माईल बंगल्यात या विवाहसोहळ्याची धामधूम सुरू असल्याचे कळले. पंजाबी आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही पध्दतीने विवाहाचे विधी करण्यात आले.
विद्या बॉलिवूडची बहुचर्चित अभिनेत्री आहे आणि सिध्दार्थ एका बडय़ा प्रॉडक्शन हाऊसचा प्रमुख या नात्याने दोघांचेही चित्रपटसृष्टीतील अनेकांशी फार चांगले संबंध आहेत. मात्र, तरीही या जोडप्याने बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजनाही आपल्या या सोहळ्यापासून दूर ठेवले होते. विवाह साधेपणाने पार पडला असला तरी लवकरच चेन्नईमध्ये भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्याबद्दल अजूनही निश्चित माहिती मिळालेली नाही.