आजघडीला माणसाचं जगणं हे असंख्य परस्परविरोधी गुंत्यांनी व्याप्त झालेलं आहे. इतरांचं सोडाच; ज्याचं त्यालाही या गुंत्यांचं नीटसं आकलन होतंच असं नाही. यासंबंधात काहीएक ठोकताळे जरूर बांधता येतात; परंतु ते शंभर टक्के अचूक ठरतील असं नाही. तशात स्त्री-पुरुष संबंध ही तर महाजटिल गोष्ट! मानवी जीवनाच्या आरंभापासून आजतागायत या संबंधांतले ताणेबाणे, त्यातल्या खोल अंधाऱ्या घळी आणि अप्राप्य शिखरं शास्त्रज्ञांपासून ते साहित्यिक, कलावंतांपर्यंत साऱ्यांना खुणावत आली आहेत. काही अजरामर कलाकृतींतून तसंच मानवी मनाचं शास्त्र उकलून दाखविणाऱ्या ज्ञानशाखांतून यासंदर्भात आजवर बरंच चिंतन, विवेचन अन् मीमांसा केली गेली असली, तरी ती पूर्णत्वाला गेली आहे असं म्हणता येणार नाही. स्त्री-पुरुष संबंधांबद्दलचे अभ्यासोत्तर निष्कर्ष एकाचे दुसऱ्याला लागू पडत नाहीत. प्रत्येकाची केस स्टडी स्वतंत्रपणे करावी लागते. मानवी जगण्यातली ही विलक्षण असंगतता संवेदनशीलांना नेहमीच विचारप्रवृत्त व अंतर्मुख करती झाली आहे. अभिजीत गुरू लिखित-दिग्दर्शित ‘तळ्यात-मळ्यात’ हे नाटक याच विषयाला हात घालतं.

अश्विन हा लेखक आपल्या पटकथेचे अनेक ड्राफ्टस् करूनही ते निर्मात्याला दाखवायला घाबरत असतो. आपण एक अयशस्वी लेखक आहोत अशी त्याची खात्री पटत चालली आहे. परिणामी तो संपूर्ण आत्मविश्वास हरवून बसलेला आहे. त्याची बायको नीलिमा ही नोकरी करणारी आहे. ती त्याला खूप समजून घेते. त्याच्या लेखनक्षमतेवर तिचा विश्वास आहे. तो उत्तम लेखक आहे याची तिला खात्री आहे. त्याचा हरवलेला आत्मविश्वास त्याला परत मिळवून देण्यासाठी ती सतत त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. त्यासाठी ती घरी-दारी सर्वत्र त्याची तरफदारी करत असते. एक ना एक दिवस तो यशस्वी लेखक म्हणून प्रसिद्धी पावेल यात तिला काहीच शंका नसते.
मात्र, तिच्या अथक प्रयत्नांतीही त्याच्यातला आत्मविश्वास जागा होत नाही. तो सदा भेदरल्या, बेचैन मन:स्थितीतच वावरत राहतो. अर्थातच याचा परिणाम त्यांच्यातल्या नवरा-बायकोच्या नात्यावरही होतो. नीलिमाचाही संयम हळूहळू संपत जातो. तीही हताश होते. अशा बुळ्या, आत्मविश्वासहीन नवऱ्याची किती काळ आपण पाठराखण करत राहायचं, असा प्रश्न तिला पडतो. पण तरीही ती तिचे प्रयत्न सोडत नाही.
मात्र नीलिमा ऑफिसला गेल्यावर हाच अश्विन एका वेगळ्याच रूपात समोर येतो. इंटेलिजन्स ब्युरोत तो गुप्तहेर असतो. त्यासाठी त्याला आपली खरी ओळख कायम लपवावी लागते. अगदी स्वत:च्या बायकोपासूनही. म्हणूनच नीलिमासमोर त्यानं आपलं रूप कणाहीन, आत्मविश्वासाचं अभाव असलेलं असं प्रोजेक्ट केलेलं असतं. परंतु या दुहेरी व्यक्तित्त्वाचा त्याला आता वीट येऊ लागलेला असतो. बायकोसमोर स्वत:ला असं पौरुषहीन, अंगात कसलंही कर्तृत्व नसलेला गृहस्थ म्हणून पेश करणं कुणाला आवडेल? त्याच्या या प्रतिमेमुळेच त्यांच्यातल्या नात्यालाही ग्रहण लागलेलं त्याला स्वच्छ जाणवतं. आणि हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस नीलिमा आपल्याला विटून घर सोडून जाईल, हेही त्याला कळून चुकलेलं असतं.
अश्विन अशा विचित्र मन:स्थितीत असतानाच त्याच्यावर सायमन नामक ड्रगमाफियाचे नापाक इरादे हाणून पाडण्याची कामगिरी सोपवली जाते. त्याची सहकारी स्वीटी हिलाही या कामगिरीवर नियुक्त केलेलं असतं. या कामगिरीवर असताना अश्विन सायमन समजून रॉबर्ट डिसोझा नावाच्या एका भलत्याच माणसाला पंचतारांकित हॉटेलमध्ये गोळ्या घालून ठार करतो. त्यावरून मीडियात एकच गदारोळ उठतो. अश्विनच्या या बेजबाबदार वर्तनाबद्दल त्याला वरिष्ठांकडून स्वीटीच्या द्वारे कडक समज दिली जाते. त्याचं आपल्या कामात हल्ली धड लक्ष नसतं, हे तिच्याही लक्षात आलेलं असतं. अश्विनच्या व्यक्तिगत आयुष्यातील ताणतणावांचाच हा परिपाक आहे, हे ती ओळखते. त्याला ती तसं बोलूनही दाखवते. सुरुवातीला तो हा आरोप नाकारतो; परंतु नंतर मात्र घडली चूक कबूल करतो. बायकोसमोरची आपली प्रतिमा त्याला अस्वस्थ करत असते. साहजिकच याचा परिणाम त्यांच्यातल्या संबंधांवर होत असल्याचं तो स्वीटीला उद्वेगानं सांगतो. स्वीटी त्यावर त्याला चांगलीच फैलावर घेते. ज्या बायकोसाठी तो आपल्या विहित कर्तव्यापासून च्युत होतो आहे, ती त्याची बायकोही त्याची फसवणूक करते आहे, तिचे दुसऱ्या एका माणसाशी संबंध आहेत, हे ती त्याला सप्रमाण सिद्ध करून दाखवते. तशात तो माणूस म्हणजे अश्विन ज्याच्या मागावर आहे तो ड्रगमाफिया सायमनच निघतो. सायमनही याचा सुगावा लागल्याने तो नीलिमामार्फत अश्विनला विषाक्त इंजेक्शन देऊन त्याचा काटा काढू पाहतो. पण नीलिमाला ते धाडस होत नाही. सायमन मग चक्क घरगडी तुकाराम बनून अश्विनच्या घरात घुसतो आणि त्याचा डाव त्याच्यावरच उलटवू पाहतो.
या सगळ्या उलटसुलट घटना-प्रसंगांनी आणि जिच्यावर आपलं जीवापाड प्रेम होतं, गाढ विश्वास होता, त्या नीलिमाच्या विवाहबाह्य़ संबंधांनी.. त्यातही ज्याचा खातमा करण्याकरता आपण त्याच्या मागावर आहोत त्या ड्रगमाफिया सायमनशीच तिचे संबंध आहेत, हे कळल्यावर अश्विन अक्षरश: भैसाटून जातो. तशातच आपल्या हातून ज्याचा चुकून खून झाला त्या रॉबर्टचा मुलगा लोबो व त्याची आई जेनी यांच्या ससेमिऱ्यानेही तो हैराण होतो.
या सगळ्याचा शेवट काय होतो, हे सांगणं इथं अप्रस्तुत ठरेल. ते नाटकातच पाहणं उचित.
लेखक-दिग्दर्शक अभिजीत गुरू यांनी हे सायको थ्रिलर नाटक अत्यंत कुशलतेनं रचलं आणि प्रयोगित केलं आहे. प्रेक्षकाला सतत संभ्रमितावस्थेत ठेवत त्यांना नाटकाशी बांधून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. नाटक वास्तववादी आहे की असंगत, या हिंदोळ्यावर त्यांना झुलवण्याचं त्यांचं कसब वादातीतच. माणसाचं वर्तमान आणि आभासी जगणं यांतला पाठशिवणीचा खेळ त्यांनी सबंध नाटकभर खेळवला आहे. आज व्हच्र्युअल विश्वात गुंगून गेलेल्या पिढीचं हे नाटक म्हणजे प्रतिबिंब आहे. भासमानता (व्हच्र्युअ‍ॅलिटी) आणि वास्तवाची सरमिसळ असलेलं जिणं जगणाऱ्या या पिढीचं आज जे काही होतंय, त्याकडे अभिजीत गुरू यांना या नाटकाद्वारे निर्देश करायचा आहे बहुधा! ‘बहुधा’ म्हणायचं कारण हे की, खरंच त्यांना तसंच म्हणायचं आहे की नाही, याबद्दल नाटकाच्या शेवटाला प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. असो. नाटकाचा शेवट त्यांनी सुलभ केला आहे. अर्थात तरीही व्यावसायिक रंगभूमीवर असं असंगत प्रकृतीचं नाटक सादर करणं हे धाडसाचंच काम आहे. गुरू यांनी नाटकात निर्माण केलेले घटना-प्रसंग, त्यातली गुंतागुंत, त्यातून उद्भवणारे पेच.. हे सारं रहस्यमयतेच्या अंगानं पुढे पुढे सरकत जातं. यातल्या पात्रांचे व्यवहार व वर्तन त्याला अधिकच खतपाणी घालतं. आणि त्यातून एक भन्नाट नाटक आकारास येतं. कोणत्याही प्रसंगाशी नाटक रेंगाळत नाही. त्याला त्याची अशी एक लय आहे. गती आहे. घटनांच्या ओघात पेच निर्माण होत जातात. मानवी वृत्ती-प्रवृत्तींची त्यास फोडणी मिळते. आणि त्यातून स्वप्न-वास्तव, भास-आभासाचा खेळ उत्तरोत्तर रंगत जातो.
विजय कोळवणकरांचं नेपथ्य मात्र नाटकाच्या जातकुळीशी काहीसं फटकून वाटतं. भूषण देसाई यांनी हा सायको थ्रिलर ड्रामा प्रकाशयोजनेतून उठावदार केला आहे. नाटकातला ड्रगमाफिया सायमन हा भयावह न वाटता सर्वसामान्य वाटावा यासाठी मुद्दाम प्रयत्न करण्यात आल्याचे जाणवते. त्याचबरोबर रॉबर्ट, लोबो व जेनीचं एक समांतर उपकथानक मुख्य गोष्टीला जोडून त्याद्वारे नाटकाची जातकुळी स्पष्ट करण्यात आली आहे. शिवदर्शन साबळे यांच्या संगीतातूनही याचे संदर्भ जाणीवपूर्वक पेरले गेले आहेत.
स्वत: अभिजीत गुरू यांनी एकाच वेळी तल्लख बुद्धीचा, तडफदार आयबी एजंट राज आणि आत्मविश्वासहीन अश्विन यांच्यातला भेद कायम ठेवत स्किझोफ्रेनिक वाटावा असा नायक मोठय़ा ताकदीनं साकारला आहे. या दोन परस्परभिन्न रूपांतली त्यांची देहबोली, व्यवहार आणि संवादोच्चार यांचा त्यांनी खोलात विचार केल्याचं स्पष्ट जाणवतं. त्यांच्या रूपानं एक अभ्यासू नट मराठी रंगभूमीला लाभला आहे. नीलिमाच्या भूमिकेतील अमृता संत यांनी उच्चारित शब्दांबरोबरच अनुच्चारित विरामांची भाषा इतक्या प्रभावीरीत्या वापरली आहे, की त्यांचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे, हे सांगूनही खरं वाटणार नाही. शब्दांचे वाच्यार्थ आणि त्यामागे दडलेले अर्थ अशा दोन्हीचा जाणीवपूर्वक विचार त्यात आढळतो. त्यांची अभिनयाची समजही सखोल आहे.
समिधा गुरू यांनी आयबी एजंट स्वीटीचं भावरहित कोरडेपण नेमकेपणी पकडलं आहे. राजू बावडेकर यांनी सायमन खलनायकी न करता सामान्य रूपात पेश करून आशयास पुष्टी दिली आहे. याउलट, घरगडय़ाच्या रूपातील तुकारामला खलनाटकी टच् देऊन त्यांनी हे विरोधाभासीत्व उन्मेखून अधोरेखित केलेलं आहे. चिन्मय पाटसकर यांनी रॉबर्ट, लोबो आणि जेनीच्या छोटय़ा भूमिकांतसुद्धा आपली छाप पाडलेली आहे.
एकुणात, आजच्या जगातील व्हच्र्युअल आणि रिअ‍ॅलिटीमधलं अद्वैत मांडणारं हे नाटक आगळ्या नाटय़ानुभवासाठी एकदा नक्कीच पाहावं असं आहे.