गेली काही वर्षे सलग अपयशी ठरलेला सैफ अली खान सध्या आपल्याच गतकाळातील चित्रपटांचा पुन्हा गांभीर्याने विचार करतो आहे. ‘हमशकल्स’ या साजिद खान दिग्दर्शित चित्रपटाने एक अभिनेता आणि सहनिर्माता म्हणून सैफची घोर निराशा झाली. त्याने ती जाहीरपणे बोलूनही दाखवली. त्याआधीही ‘एजंट विनोद’ असेल किंवा तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित ‘बुलेट राजा’ हा चित्रपट असेल, वेगवेगळ्या भूमिका करूनही अपयशी ठरल्याने आपल्याला पुन्हा एकदा स्वत:च्या जुन्या चित्रपटांचा आणि मिळालेल्या यशाचा अभ्यास करायला हवा, असे आपल्याला वाटत असल्याचे सैफ सांगतो.
या वर्षीचा त्याचा तिसरा ‘हॅप्पी एन्डिंग’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे. हा चित्रपट बॉलीवूडच्या नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळे असल्याचा तो म्हणतो. ‘हॅप्पी एन्डिंग’ हा राज निदीमोरू आणि कृष्णा डी के या दिग्दर्शकद्वयीचा चित्रपट आहे. ‘‘राज आणि कृष्णाबरोबर मी ‘गो गोवा गॉन’ केला होता. त्यांच्याबरोबर काम करायला मला जास्त आवडतं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्यावर अमेरिकन चित्रपट आणि मालिकांचा प्रभाव आहे. माझ्यावरही तो आहे. हिंदीपेक्षा अमेरिकन मालिका पाहायला मला फार आवडतात. त्यामुळे या दोघांबरोबर काम करताना कथेच्या मांडणीपासून ते त्यांच्या दिग्दर्शन शैलीतही आजच्या काळातील तरुण पिढीच्या जगण्याचा संदर्भ असतो, जो मला वाटतं फार महत्त्वाचा आहे,’’ असे सैफने सांगितले. या नव्या चित्रपटात सैफ दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. एका भूमिकेत तो लेखक आहे, तर दुसऱ्यात तो एका स्टेजवर कार्यक्रम करणाऱ्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. त्यांच्या समस्या या सर्वसामान्य माणसाच्या नाहीत किंवा ते वागतात तेही फार विचित्र असतं. यातला लेखक जो आहे तो श्रीमंत माणसांच्या कथा लिहून पैसा कमवत असतो. त्याचं दु:ख असं आहे की, पाच वर्र्षांपूर्वी त्याने एक कादंबरी लिहिली होती. त्यानंतर काहीही लिखाण त्याला जमलेलं नाही. त्यामुळे त्याची अवस्था फारच बिकट झाली आहे आणि आता लेखक म्हणून काम करायचं, की येनकेनप्रकारेण पैसा कमवायचा.. अशा द्विधा मन:स्थितीत तो आहे. त्याच्यासमोर प्रसंगानुरूप ज्या अडचणी येतात त्या विनोदी आहेत.. एकूणच अमेरिकन रॉमकॉम पद्धतीने लिहिलेला असा हा चित्रपट असल्याची माहिती सैफने दिली.
सैफने या चित्रपटात पहिल्यांदाच गोविंदाबरोबर काम केलं आहे. गोविंदाबरोबर काम करताना धमाल आली, असे तो म्हणतो; पण वैयक्तिक स्तरावर त्याच्याशी फार गप्पा मारता आल्या नाहीत. आम्ही दोघांनीही विनोदी चित्रपट केले आहेत; पण या वेळी काम करताना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे विनोदी अभिनेता म्हणूनही आम्ही दोघे फार वेगळे आहोत. माझा भर हा नेहमी संयत पद्धतीने विनोदी अभिनय करण्यावर राहिलेला आहे.
गोविंदाच्या बाबतीत तसं शक्य नाही, त्यामुळे राज आणि कृष्णाने त्याच्या स्वभावानुसार त्याच्याकडून काम करू न घेतलं, असं सैफने सांगितलं. सैफ विनोदी चित्रपटांमध्येच रमला आहे का, असं विचारल्यावर तो म्हणतो, मी हरेक तऱ्हेचे चित्रपट करून पाहिले आहेत.
तिग्मांशूचा ‘बुलेट राजा’ हा चित्रपट केला, कारण मला त्याच्याबरोबर काम करायचं होतं; पण चित्रपट यशस्वी झाला नाही. ‘हमशकल्स’ करतानाही तसाच विचार केला होता. त्या चित्रपटात मी ज्या पद्धतीने विनोदी भूमिका केली आहे तशी मी आजवर कधीही केलेली नाही. माझ्या मूळ स्वभावाला धरून असणारं असं त्यात काहीही नव्हतं आणि एक आव्हान म्हणूनच मी ते केलं, मात्र तोही अपयशी ठरला तेव्हा वाईट वाटलं. तुम्ही प्रत्येक चित्रपट करत असताना मेहनत घेतलेली असते, काहीएक अभ्यास असतो, त्यामुळे ते चित्रपट अपयशी ठरतात तेव्हा खूप दु:ख होतं, असं तो म्हणतो.
यापुढे नवीन चित्रपट करताना जाणीवपूर्वक स्वत:हून काही पटकथांचा अभ्यास करणं सुरू आहे, असं तो म्हणतो. सध्या मी माझ्याच चित्रपटांबद्दल विचार करतो आहे. मग तो ‘ओमकारा’ असेल, ‘परिणीता’ असेल किंवा ‘एकलव्य’ असेल, माझ्या संवेदनांशी मिळतेजुळते चित्रपट करणं ही माझी आजची गरज आहे. तसे चित्रपट खरंच मिळत नाहीत; पण त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू असल्याचे सैफ ने सांगितले.
‘हॅप्पी एन्डिंग’नंतर कतरिना कैफबरोबर ‘फँ टम’ सारखा अ‍ॅक्शनपट, त्यानंतर रीमा कागती आणि सुजॉय घोषबरोबर दोन चित्रपट तो करतो आहे. मग पुन्हा एकदा आपल्या होम प्रॉडक्शनसाठी राज आणि कृष्णा या दिग्दर्शकद्वयीबरोबर काम सुरू करेन, असे सैफने सांगितले.