हैदराबाद येथील फालाक्नुमाल पॅलेसमध्ये मंगळवारी शाही सोहळ्यात बॉलीवूड दबंग खान सलमानची बहिण अर्पिता खान आयुष शर्मासोबत लग्नबंधनात अडकली. आपल्या लाडक्या बहिणीच्या विवाहसोहळ्याची सलमानने मोठ्या थाटात तयारी केली होती. लग्नसोहळ्याला अवघे बॉलीवूड हैदराबदमध्ये दाखल झाले होते. बॉलीवूड कलाकारांपासून उद्योगपती, राजकारणी आणि अनेक बड्या हस्तींनी अर्पिता-आयुष या नवविवाहीत जोडप्याला आर्शिवाद दिले. आता सलमानचा मेहुणा म्हटले की, आयुष शर्मा प्रसिद्धीच्या झोतात येणारच. सर्वत्र सध्या आयुष विषयी सुरू झाली आहे. यापार्श्वभूमीवर आयुष शर्मा विषयी थोडक्यात काही…

आयुष शर्मा हा मूळचा दिल्लीकर असून त्याचे वडील अनिल शर्मा हे हिमाचल प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. तर, काँग्रेसचे दिवंगत माजी केंद्रीय मंत्री सुख राम हे आयुषचे आजोबा. कौटुंबिक स्तरावर आयुषला राजकीय पार्श्वभूमी असली तरी, आयुषला राजकारणात रस नाही. आयुष सध्या दिल्लीतील आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळत आहे. पण, लग्नानंतर मुंबईत कायमस्वरूपी स्थायिक होऊन अभियनात आवड असल्यामुळे बॉलीवूडमध्ये करिअर करण्याचा विचार आयुष करत आहे.
अर्पिता आणि आयुष यांची काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात तोंडओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये २०१३ सालापासून गाठीभेटी सुरू झाल्या. अखेर मैत्रीच्या नात्याचे प्रेमात रुपांतर झाले आणि हे प्रेमीयुगुल लग्नबंधनात बांधले गेले.

संबंधित बातम्या-
हैद्राबादच्या मकदूम ब्रदर्सनी साकारला आयुष शर्माचा पोषाख
सलमानकडून अर्पिताला १६ कोटींचे गिफ्ट!