रणबीरविषयी एक प्रश्न जरी आला तरी ऋषी कपूर अर्थात चिंटूजींना फार फार राग येतो. हल्ली हे प्रमाण थोडे कमी झाले होते. ‘बेशरम’च्या चित्रिकरणादरम्यान ऋषी, नीतू आणि रणबीर असे कुटुंबच एकत्र काम करत असल्यामुळे तर चिंटूजी सगळ्यांशीच गुण्यागोविंदाने वागू लागले होते. मात्र, हल्ली त्यांचा रागाचा पारा पुन्हा चढायला लागला आहे. दोन गोष्टींचे नाव काढले की चिंटूजी फार चिडतात. एक म्हणजे ‘बेशरम’चा दिग्दर्शक अभिनव कश्यप आणि दुसरा चिरंजीव रणबीर.
सध्या ऋषी कपूर ‘आई बला को टाल तू’ नामक राजकीय-सामाजिक भाष्य करणाऱ्या चित्रपटात काम करत आहेत. याच चित्रिकरणात व्यग्र असणाऱ्या चिंटूजींना कुणीतरी पुन्हा एकदा अभिनव कश्यपविषयी विचारले आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अभिनव कश्यपबरोबर काम करणे ही घोर चूक होती. मी, नीतू आणि रणबीर आम्ही तिघेही त्याच्या ‘बेशरम’मध्ये काम करून पस्तावलो आहोत. त्याने जेव्हा आम्हाला कथा ऐकवली होती तेव्हा हा चित्रपट एकदम मनोरंजक असेल, अशी आमची कल्पना होती. पण, प्रत्यक्षात पडद्यावर जे दिसले ते फारच वाईट होते. त्याचा फाजील आत्मविश्वास त्याला आणि त्याच्यामुळे आम्हाला नडला आहे.
चिंटूजींची ‘अभिनव’ बडबड थांबेना म्हणून बिचाऱ्या प्रश्नकर्त्यांने त्यांना रणबीरविषयी प्रश्न टाकला आणि बापरे! बाप! चिंटूजी असे काही उसळले की समोरच्यांचे धाबेच दणाणले. रणबीरविषयी मला काहीही विचारायचे नाही, असा सज्जड दमच त्यांनी भरला. रणबीरने आपली प्रेमिका, आपले चित्रपट या सगळ्याच गोष्टींबाबत प्रसिध्दीमाध्यमांना दूर ठेवले आहे. त्यामुळे त्याच्याविषयी विचारायचे कोणाला या चिंतेत असलेल्यांना चिंटूजी दिसले की आनंदाने मन भरून येते. त्याच आनंदाच्या भरात मग रणबीरविषयी प्रश्नांची सरबत्तीच त्यांच्यावर सुरू होते. त्यामुळे सध्या वैतागलेल्या चिंटूजींनी रणबीर आणि मी दोन स्वतंत्र व्यक्ती आहोत हे लक्षात घ्या. आणि एक स्वतंत्र व्यक्ती असल्याकारणाने सारखे सारखे रणबीरविषयी प्रश्न विचारून मला त्रास देऊ नका, असे चिंटूजींनी स्पष्ट केले आहे. ते स्वत: सध्या अभिनव कल्पनेवरील चित्रपटात काम करत आहेत. हरयाणात स्वच्छतागृह उभारण्याच्या योजनेत जो घोटाळा झाला त्यावर त्यांचा ‘आई बला को टाल तू’ हा चित्रपट बेतला आहे. मात्र, सध्यातरी चिंटूजींच्या रागाची बला टाळायची असेल तर ‘अभिनव कश्यप’,‘बेशरम’ आणि  ‘रणबीर’ हे तिन्ही शब्द टाळायचे एवढेच आपण लक्षात घेऊ शकतो!