एकता कपूरच्या ‘किलिक अ‍ॅण्ड निक्सन’ स्टुडिओला आग लागल्यामुळे स्टुडिओतील कपडेपट या आगीत जळून भस्मसात झाला. त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण कसे करायचे असा प्रश्न उभा राहिला होता. सध्या या स्टुडिओत ‘यह दिल सुन रहा है’ मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. मात्र कपडय़ांचा प्रश्न मालिकेतील कलाकारांनी एकत्र येऊन सोडविला आहे. मालिकेचा नवीन कपडेपट येईपर्यंत कलाकार स्वत:चे कपडे वापरून चित्रीकरण पूर्ण करीत आहेत. सोनी पल या नव्यानेच सुरू झालेल्या वाहिनीवरील ही मालिका आहे.
‘यह दिल सुन रहा है’ ही एकता कपूरची निर्मिती असलेली मालिका सोमवार ते शुक्रवार दररोज प्रसारित होते. त्यामुळे मालिकेतील कपडेपट जळून खाक झाला तरी चित्रीकरण थांबविणे शक्य नव्हते. निर्मात्यांनी मोठय़ा प्रमाणावर कपडे आणि इतर गोष्टी मागविल्या आहेत. मात्र त्या स्टुडिओपर्यंत पोहोचण्यासाठी अजून काही दिवस लागणार असल्याचे  सांगण्यात आले. ऐन दिवाळीत लागलेली आग, आणि दिवाळी विशेष भागांचे सुरू असलेले चित्रीकरण यामुळे निर्मात्यांसमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता. मात्र मालिकेतील कलाकारांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडविला. या मालिकेतील कलाकार अजूनही स्वतचे कपडे वापरून चित्रीकरण करीत आहेत.
सोनी पल ही नवीन वाहिनी असून ‘यह दिल सुन रहा है’ १६ ऑक्टोबरपासूनच सुरू झाली आणि अल्पावधीत या वाहिनीवरील सर्वाधिक टीआरपी मिळविणारी मालिका बनली. नुकत्याच सुरू झालेल्या मालिकेतील लोकप्रिय ठरत असलेल्या व्यक्तिरेखा आणि त्यांची वेशभूषा यात बदल करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळेच कपडेपट जळाल्यानंतर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. परंतु, मालिकेच्या कलावंतांनी नवीन कपडेपट येईपर्यंत भूमिकेबरहुकूम कपडेपट स्वत: तयार करून वापरायला सुरुवात केली आणि कोणत्याही परिस्थितीत ‘शो मस्ट गो ऑन’ची प्रचिती आणून दिली.