हिंदी वाहिन्यांवर डब करून दाखवले जाणारे दाक्षिणात्य चित्रपट आपल्याला चांगलेच परिचित आहेत. रोज प्रत्येक वाहिनीवर एकतरी डब केलेला दाक्षिणात्य चित्रपट पाहायला मिळतोच. आता लवकरच ‘झी टॉकीज’सुद्धा या डबिंगच्या स्पर्धेत उतरणार आहे. ‘रावडी एक्स्प्रेस’ या नावाखाली १३ जुलैपासून दर शनिवार आणि रविवारी रात्री ९.३० वाजता डब केलेले दाक्षिणात्य चित्रपट झी टॉकीजवर दाखवण्यात येणार आहेत.
भारतात डब केलेल्या चित्रपटांची संख्या मोठी आहे. हल्ली हॉलिवूडचा प्रदर्शित होणारा प्रत्येक चित्रपट हिंदीशिवाय तेलुगु, कन्नड, तमिळ, मल्याळम या भाषांमध्ये डब होतो. हिंदी वाहिन्यांवरील डब चित्रपटांना मोठा प्रेक्षकवर्ग आहे. हे सारे लक्षात घेऊन ‘झी टॉकीज’नेही डबिंगमध्ये उतरण्याचा निर्धार केला आहे.
‘महाराष्ट्रात मुंबई-पुणे सोडल्यास अन्यत्र मराठी सोडता दुसऱ्या भाषांतील चित्रपट फार कमी प्रमाणात पाहिले जातात. याचे महत्त्वाचे कारण भाषेचा अडसर हे असते. हा अडसर दूर केल्यास जागतिक चित्रपटासाठी एक मोठा मराठी प्रेक्षकवर्ग लाभू शकेल, अशी अपेक्षा झी टॉकीजचे बिझनेस हेड, ‘भावेश जानवलेकर’ यांनी व्यक्त केली. या उपक्रमाची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटांपासून करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
यापुढचे पाऊल म्हणून ‘लायन किंग’, ‘फायटिंग निमो’सारख्या प्रसिद्ध अॅनिमेशनपटांचे डबिंग करून ते मराठीत दाखवण्याचा मानसही भावेश यांनी यानिमित्ताने बोलून दाखवला. या माध्यमातून जागतिक चित्रपटापासून काहीसा दूर असलेला मराठी प्रेक्षकाला एकत्र आणण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.