रविवार आणि त्यामध्ये भारताचा एकदिवसीय सामना, त्यातही विराट कोहलीच्या नेतृत्वाची पहिली कसोटी. क्रिकेटचा सामना आणि नाटक यांचं तसं वाकडंच. सुट्टीच्या दिवशी क्रिकेट सामना असेल तर अजूनही रस्ते काहीसे ओस पडतात. पण दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये मात्र चित्र काहीसे वेगळे होते. सनईचा सूर कानात रुंजी घालत होते. तिकीट बारीवर तोबा गर्दी होती. काही जण जास्तीची तिकीट आहे का?, अशी विचारणा करत होते. निमित्त होते ते ‘गेला उडत’ नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाचे.

या खास प्रयोगाला प्रमुख पाहुणे म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले होते. नेहमीप्रमाणे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. नाटक सुरू असताना काहींच्या नजरा राज यांच्यावर खिळल्या होत्याच. नाटय़गृहात हास्यांचे कारंजे उडत होते, टाळ्यांचा कडकडात, शिटय़ांचा नाद होत होता. सिद्धार्थ जाधव आपल्या उत्स्फूर्त ऊर्जेच्या जोरावर तुफान मनोरंजन करत होता. नाटक विनोदी असले तरी नाटकादरम्यान एकदाही राज हसले नाहीत. कलाकारांसह साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का होता. राज यांच्या न हसण्याचं कोडं काही सुटेना. मध्यांतराच्या वेळी आणि प्रयोग संपल्यावर राज यांनी कलाकारांची भेट घेतली, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली; पण ते नाटकात एकदाही हसले नाहीत, याची सल कलाकारांना होतीच. राज नाटय़गृहातून बाहेर पडले आणि त्यानंतर नाटकाचे लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या कोडय़ाची उकल केली. ‘नाटकापूर्वीच राज यांनी माझ्याशी पैज लावली होती की, नाटक विनोदी असले तरी मी एकदाही हसणार नाही. त्यामुळे ते एकदाही हसले नाहीत’, असं केदार यांनी सांगितल्यावर कलाकारांनी हुश्श केलं.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल

नाटकात सिद्धार्थच्या वडिलांची भूमिका करणाऱ्या सुमीत सावंतला एकही संवाद नाही, पण त्याची स्तुती राज यांनी केली. त्यानंतर ‘सिद्धूएवढी ऊर्जा असलेला दुसरा नट मराठी नाटय़सृष्टीत नाही,’ अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली.

या नाटकाची शतकी खेळी खेळणाऱ्या केदार यांनी यावेळी नाटकाच्या प्रक्रियेदरम्यानचा एक किस्सा सांगितला. ‘हे नाटक म्हणजे माझं अपत्य आहे, जे आता सिद्धूच्या स्वाधीन केलं आहे. पण या अपत्याची जडणघडण सोपी नव्हती. मी काही प्रमाणात नाटक लिहिलं आणि त्यानंतर मला काहीच सुचत नव्हतं. नाटक तर वेळेत प्रदर्शित करायचं होतं. त्यामुळे जेवढं नाटक लिहून झालंय, तेवढय़ा नाटकाची मी तालीम सुरू केली. तालीम पाहून झाल्यावरही काही सुचत नव्हतं. असं काही घडलं की, मी माझ्या जुन्या मित्राशी संवाद साधतो आणि तो म्हणजे अंकुश चौधरी. नाटकाच्या तालमीदरम्यान मी अंकुशला एकदा बोलावलं, त्याने तालीम पाहिली. त्यानंतर आम्ही चर्चा करायला बसलो. त्या चर्चेतून मला नाटकाचा काही भाग सुचत गेला आणि त्यानुसार मी लिहून नाटक पूर्ण केलं’.

बऱ्याच वर्षांनी सिद्धार्थ नाटकात काम करत होता. याबद्दल तो म्हणाला की, ‘मला नाटक करायचंच होतं. केदार सरांनी चारपाच संहिता मला ऐकवल्या, पण त्या माझ्यासाठी नव्हत्या, असं मला वाटलं. मी काही हीरोसारखा देखणा वगैरे नाही. त्यामुळे मी त्या केल्या नाहीत. पण केदार सरांनी मला एका वाक्यात ‘सुपर हिरो’ची एक गोष्ट ऐकवली आणि ती मला आवडली’.

‘या नाटकाचे दोन किस्से मला कायम स्मरणात राहतील. एकदा एक ज्येष्ठ नट सन्मानिका घेऊन बोरिवलीला नाटक पाहायला आले होते. प्रयोगानंतर ते आम्हाला भेटले आणि म्हणाले ‘मी सिद्धूचं एवढं सुंदर काम फुकट पाहूच शकत नाही’. त्या सन्मानिकाचे पैसे त्यांनी देऊ केले, पण आम्ही ते घेतले नाहीत. ही माझ्यासाठी मोठी पोचपावती होती. त्यानंतर एकदा आम्ही कर्नाटकला प्रयोग करायला गेलो होतो. प्रयोग खुल्या मैदानात होता आणि जोरदार पाऊस सुरू होता. पण त्या परिस्थितीतही प्रेक्षक छत्र्या घेऊन प्रयोगाचा आनंद लुटत होते’, अशी आठवण सिद्धार्थने सांगितली.

शंभरावा प्रयोग संपल्यावर निर्माते प्रसाद कांबळी यांनाही या नाटकाचा एक किस्सा सांगितल्याशिवाय राहावलं नाही. ‘आमचा प्रयोग नांदेडला होता. त्यावेळी सिद्घार्थच्या मोठय़ा भावाची भूमिका करणाऱ्या गणेश जाधवला डेंग्यू झाल्याचे समजले. त्याच्यासहित आमचेही हातपाय गळाले. काय करायचे काहीच सुचेना. पण त्या परिस्थितीतही गणेशने कसलीही तमा न बाळगता तो प्रयोग केला. तो जर उभा राहिला नसता तर हा प्रयोग होऊच शकला नसता’.

एका सुंदर गोष्टीला नजर न लागावी म्हणून जशी काळी तीट लावतो, तशी बाब या सोहळ्यानंतरही घडली. प्रयोग संपल्यावर केदार, सिद्धार्थ, प्रसाद सारेच प्रसारमाध्यमांना मुलाखती देत होते. त्यांच्या मुलाखती सुरू असतानाच नेपथ्य उचलून गाडीत भरायचे काम बॅकस्टेज कलाकार करत होते. त्यावेळी एक मुलाखत संपल्यावर केदार भडकले. ‘तुम्हाला एवढी कसली घाई आहे. आपल्या प्रेमापोटी ही प्रसारमाध्यमांतील मंडळी आली आहेत. त्यांना मुलाखत देताना तुम्ही नेपथ्य काढून नेताय, कसे दिसते हे, एवढी कसली घाई, खरंतर पूर्ण नेपथ्य ठेवूनच मुलाखती द्यायला हव्या होत्या. तुम्ही नेपथ्य ठेवलं नाही, आता काढून नेताय, आत्ता लगेच दुसरा प्रयोग आहे का? कसली घाई करताय, मी उचलतो हवंतर सारं नेपथ्य,’ असं म्हणत केदार यांचा पारा चढला होता.

सध्याच्या घडीला एखाद्या नाटकाचे शंभर प्रयोग होणं, ही कौतुकाचीच बाब. आता केदार यांच्या म्हणण्याप्रमाणे शंभरावर अजून एक शून्य लागतो का, ते पाहणं उत्सुकतेचे असेल.