सध्याच्या घडीला चित्रपटसृष्टीमध्ये ‘बाहुबली २’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. एस. एस. राजमौली दिग्दर्शित या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हैदराबादमध्ये रविवारी चित्रपटाच्या ऑडिओते लाँचिंग करण्यात आले. यासाठी रंगतदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दाक्षिणात्य कलाकारांसोबत बॉलिवू़डमधील आघाडीचा निर्माता करण जोहर देखील उपस्थित होता.
मोठ्या दिमाखात पार पडलेला हा कार्यक्रम ऐतिहासिक असल्याचे मत यावेळी करण जोहरने व्यक्त केले.

चित्रपटसृष्टीत ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटानंतर तब्बल ६७ वर्षांनंतर असा कार्यक्रम रंगल्याचे पाहायला मिळत असल्याचे तो म्हणाला. ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटाविषयी बोलायचे तर १९६० सालातील सलीम-अनारकली यांच्या प्रेमकथेवरील के. आसिफ यांच्या या चित्रपटावेळीही अशीच भव्यदिव्यता पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या भव्यतेला मागे टाकल्याचे सांगत करणने ‘बाहुबली २’च्या प्रदर्शनापूर्वी रंगलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. ‘बाहुबली २’ हा चित्रपट तामिळ, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे हक्क हे करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनकडे आहेत. या चित्रपटात खारीचा वाटा उचलण्याची संधी दिल्याबद्दल त्याने एस एस राजमौली यांचे आभार मानले.

‘बाहुबली २- द कन्क्ल्युजन’च्या प्रदर्शनापूर्वी आयोजित कार्यक्रमात बोलताना करण म्हणाला की, भारतीय चित्रपटसृष्टीतील हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. बाहुबली चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी रंगलेल्या या कार्यक्रमाने ६७ वर्षांचा इतिहास मोडीत काढत ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. दरम्यान, बाहुबलीचे निर्माता शोबू यरलागड्डा यांनी बाहुबली चित्रपटाच्या बॉलिवूडमधील प्रसिद्धीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल करणचे आभार मानले.