काही दिग्दर्शक जाणूनबुजून एखादी विशिष्ट जुनीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामागची भूमिका सर्वच प्रेक्षकाला माहिती असावी किंवा त्याने ती जाणून घ्यावी या अपेक्षेने ते काम करीत नाहीत. पण त्यांचा अनुयायी सिनेवेडा वर्ग मात्र त्यांच्या सिनेमातील वेगळेपणा हेरून त्यांच्या चित्रपटांच्या मागावर राहतो. डॅनी बॉएल या ब्रिटिश दिग्दर्शकाने १९९४-९५ सालातील पहिल्या ‘शॉलो ग्रेव्ह’ या चित्रपटापासून अचानक येणारा पैसा आणि त्यातून बिघडणाऱ्या गोष्टींवर चित्रपट बनवायला सुरुवात केली. मध्ये त्याने वेगळे विषयही हाताळले. पण ‘मिलियन्स’ आणि भारतात येऊन केलेल्या ‘स्लमडॉग मिलिऑनेर’ या चित्रपटांद्वारे त्याच्या पैसा-गुन्ह्य़ांची पूर्णपणे भिन्न चित्रत्रयी पूर्ण झाली. आयरिश-अमेरिकी दिग्दर्शक जॉन कार्नीचे ‘वन्स’, ‘बिगिन अगेन’ आणि ‘सिंग स्ट्रीट’ हे सिनेमे सलग पाहिले, तर सांगीतिका किती वेगळ्या पद्धतीने हाताळली जाऊ शकते याचा शोध लागेल. त्याचबरोबर दिग्दर्शकाच्या चित्रपटामधला गोष्ट सांगण्याचा समान धागा समजू शकेल. डेव्हिड लाऊरी या दिग्दर्शकाचा यंदा बऱ्यापैकी चर्चेत असलेला ‘ए घोस्ट स्टोरी’ नावाचा जराही न घाबरवणारा कलात्मक भूतपट पाहाताना या धाग्याची गरज आवश्यक आहे.

डेव्हिड लाऊरीच्या कामाकडे जगभराचे लक्ष जाण्यासाठी त्याचा ‘ए’ण्ट देम बॉडीज सेण्ट्स’ या नावाचा चित्रपट २०१३ येऊन गेला. वरवर ही गुन्हेकथा असली, तरी त्यात त्याने गंमत केली होती ती पटकथेची. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत उच्छाद मांडलेल्या ‘बोनी अ‍ॅण्ड क्लाइड’ आणि त्यांच्या टोळीच्या वास्तव गोष्टींच्या वृत्तलेखांचा आधार घेऊन आजच्या काळात ती गोष्ट कशी घडेल याचा एक आराखडा तयार केला. त्याला भडक गुन्ह्य़ांचे कारनामे दाखवायचेच नव्हते. केसी अफ्लेक आणि रुनी मारा यांची भूमिका असलेला हा चित्रपट अनेक बाबींसह दृश्यसौंदर्यासाठी गाजला. गुन्हेकथेची कलात्मक मांडणी करता येऊ शकते, हे लाऊरी याने त्या चित्रपटाद्वारे दाखवून दिले. त्यानंतर त्याने आपल्या शैलीतच भूतकथेचा प्रकार हाताळायचे ठरविले आणि ‘ए घोस्ट स्टोरी’ तयार झाला.

businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
how much Rihanna charges to perform at a private event (1)
रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म
Centre for Development of Advanced Computing (C-DAC), ICT electronic, pune, pune news
वर्धानपनदिन विशेष : ‘सीडॅक’, इलेक्ट्रॉनिक ‘आयसीटी’त देशाला स्वावलंबी बनवण्याचा वसा!
documentary making and Changers of Attitudes
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृष्टिकोनातला बदलकार..

आता मुद्दा हा की, गुन्हे किंवा भूतपट कलात्मक नसतात का, तर त्यांच्यातील कला ही पूर्णत: प्रेक्षकशरण आणि पठडीला न सोडणारी असते. गुन्हेपटामध्ये अमूक एका टप्प्यावर खून, दरोडे, चोरी किंवा घातपात असतात. भूतपटामध्ये अमुक  एका टप्प्यावर घाबरवणाऱ्या घटना, विचित्र-कर्णकर्कश्य संगीत मांडणी असते, त्यात प्रेक्षकाला उगा विचार करण्याची बाब गृहीत नसते. लाऊरीच्या दोन्ही चित्रपटांमध्ये त्या त्या चित्रप्रकाराच्या अनुषंगाने अपेक्षित मूलभूत घटक नाहीत. पण विचारचक्र वेगाने सुरू ठेवत हे चित्रपट मनोरंजनाचा कार्यभाग उत्तमरीत्या पार पाडतात.

‘ए घोस्ट स्टोरी’मध्ये सी (केसी अफ्लेक) आणि एम (रूनी मारा) हे प्रेमळ नवदाम्पत्य उपनगरातील निसर्गसान्निध्यातील घरात राहात असतात, हे चित्रपटाच्या सुरुवातीला समोर येते. त्यांच्या दैनंदिन जगण्यातल्या एका दिवसाचा भाग पूर्ण झाल्यावर एका मोठय़ा अपघातामध्ये सी याचा मृत्यू होताना दाखविले आहे. अंत्यसंस्कारापूर्वी रुग्णालयामध्ये एम त्याला शेवटचे पाहून घेते. ती परततानाच रुग्णालयात सी झोपलेल्या जागेवरून चादर पांघरलेली अमानवी शक्ती घरी परतण्यासाठी सज्ज झालेली असते. हे सी याचे चादर पांघरलेले भूत कुणालाच दिसत नाही.

आप्त व्यक्तीच्या मृत्युपश्चात दु:खांचे एकामागून एक रडवे कढ दाखविणारा किंवा भूत झाल्यानंतर सी याचा एमची देखरेख करणारा वा तिला होणाऱ्या संभाव्य त्रासापासून बचाव करणारा हा चित्रपट नाही. त्याचे प्रयोजन वेगळे आहे. हा चित्रपट पाहणारा दर्शक भूत या संकल्पनेबाबत दूरगामी विचार करण्यास प्रवृत्त व्हावा हा इथला हेतू आहे. अन् तो प्रत्येकाच्या विचार करण्याच्या वकुबानुसार पूर्ण होऊ शकतो. आत्तापर्यंत आपण पाहिलेले भूतपट, वाचलेल्या-ऐकलेल्या भूतकथांतील कित्येक दुवे इथल्या रहस्य उलगडण्यासाठी उपयुक्त ठरतात.

सी याच्या मृत्यूच्या आणि भूत होऊन घरात दाखल होण्याच्या दिवशीपासून एमचा तीव्र दु:खातून सावरेपर्यंतचा काळ इथे प्रचंड वेगात सरकवण्यात आला आहे. सावरल्यानंतर तिने नवे आयुष्य सुरू करताना या भुतामध्ये मानवी मत्सराचा अंश दाखल होताना दाखविला गेला आहे.

या घराची मालकी हस्तांतरण होताना तेथे एका पार्टीमध्ये निवेदन करणाऱ्या व्यक्तीद्वारे मानवी अस्तित्वाची भौतिकशास्त्रीय तत्त्वांद्वारे स्वगते मांडून पुढे चित्रपटाला निश्चित दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.

भूत दाखवून त्या परिसरातील भूतकाळ आणि भविष्याचा पट उभा करून दिग्दर्शकाने अधिकाधिक माणूसपणाविषयी भाष्य केले आहे. मानवाचे जगणे नक्की कशाभोवती निगडित असते, अतृप्ती किंवा जगण्याची तीव्र आस अचानक आलेल्या मृत्युपश्चात कोणत्या अवस्थेत व्यक्तीला नेऊ शकते. या विषयीचे काल्पनिक भूतविचार अत्यंत कलात्मक मनोरंजनाद्वारे रंगविण्यात आले आहेत. या दिग्दर्शकाचे पुढील ‘पीटर पॅन’ आणि ‘ओल्ड मॅन अ‍ॅण्ड गन’ हे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चेत आहेत. एक साहित्यातील अजरामर पात्र आहे, तर दुसरे अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगारावरच्या रिपोताजचे चित्रपटीय रूप. ते गाजण्याआधी या दिग्दर्शकाच्या कामाचे स्वरूप ‘ए घोस्ट स्टोरी’मधून लक्षात येऊ शकेल.