गायक आणि संगीतकार ए. आर. रेहमान ने आज बहुचर्चित डॉक्युमेंट्री सेरीज ‘डॉटर्स ऑफ डेस्टिनी’चे पोस्टर रिलीज केले. ही डॉक्युमेंट्री येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या मालिकेला ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रेहमानने संगीत दिले आहे. रेहमानने या डॉक्युमेंट्रीचे पोस्टर ट्विटरच्या माध्यमांतून रिलीज केले आहे.

ऑस्कर विजेत्या वनेसा रोथने या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शन केले आहे. बंगळूरू येथील ‘शांती भवन’ या शाळेवर ही डॉक्युमेंट्री बनवण्यात आली आहे. येथे वंचित वर्गाच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात येते. या योजनेनुसार या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे जीवन हे योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही गरीब कुटुंबातील पाच मुलींची कथा आहे. ज्यांचा आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकाच वेळी अभ्यास आणि संघर्ष सुरु आहे.

रेहमान सध्या मजीद मजीदीच्या ‘बियॉंड दि क्लाऊड्स’ या सिनेमाच्या तसेच ‘संघमित्रा’ आणि ‘२.०’ या तामिळ सिनेमांच्या कामात व्यस्त आहे. विशेष म्हणजे रेहमानच्या जीवनावर आधारित सिनेमा ‘वन हर्ट : दि ए. आर. रेहमान कॉन्सर्ट’ येत्या २५ ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर यापूर्वीच रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर रेहमानच्या दोन पैलूंचे दर्शन घडवतो. यामध्ये शांत, एकाकी राहणारा, निसर्गावर प्रेम करणारा तसेच संगीतावर प्रेम करणारा माणूस या त्याच्यातील गोष्टींचा समावेश आहे. रेहमानच्या २५ वर्षांच्या सिनेसृष्टीतील कामाच लेखाजोखा यात पहायला मिळणार आहे.