सेन्सॉर बोर्डाने उडता पंजाब या चित्रपटाला दिलेले ८९ कट्स आणि शीर्षकातील पंजाब या शब्दाचा उल्लेख काढून टाकण्याचे आदेश यामुळे बॉलीवूडमध्ये सेन्सॉरशिप हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. उडता पंजाब चित्रपटाच्या वादामुळे बॉलीवूड जगतात बराच गोंधळ माजला आहे. बॉलीवूडची क्वीन कंगना रणौत हिला काही महिन्यांपूर्वी इंडियन ऑफ द इयर २०१५च्या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यावेळी तिला पुरस्कार प्रदान केल्यानंतर बॉलीवूड सेन्सॉरशिपबाबत प्रश्न करण्यात आला होता. त्यावेळी तिने याबाबत काही मुद्दे मांडले होते त्यावर एक नजर टाकूया.
कंगना म्हणाली होती की, ज्या काही गोष्ट घडत आहेत त्याबाबत आम्हा सर्वांनाच चिंता आहे. मी काही दिग्दर्शक नाही त्यामुळे सेन्सॉरशिप चक्राबद्दल मला काहीच माहिती नाही. पण माझे काही मित्र आहेत ज्यांना यामुळे बराच त्रास सहन करावा लागला आहे. खरंतर ते स्वतःला गुलाम समजू लागले आहेत. आपण प्रेक्षकांचे आई-वडील आहोत असे समजून त्यांचे संरक्षण करण्याची काहीच गरज नाहीये.
माझ्या क्वीन चित्रपटावेळची एक घटना मला आठवते. या चित्रपटातील एका दृश्यात माझे अंतर्वस्त्र पलंगावर पडलेले दाखविण्यात आले होते. त्यावेळी माझ्या दिग्दर्शकाने मला बोलावून घेतले आणि म्हणाला सेन्सॉर बोर्डाने या दृश्यावर आपत्ती घेतली असून त्यास अंधुक करण्यास सांगितले आहे. या एका अंतर्वस्त्राने परदेशापासून लाजपतनगरपर्यंत सर्व काही हलवून टाकल्याने आम्हाला धक्काच बसला. आपण अनेक गोष्टीत समाजासाठी काहीतरी धोकादायक असल्यासारखे का बघतो? स्त्रियांची अंतर्वस्त्रे ही समाजासाठी धोकादायक नाहीत. मी अपेक्षा करते की भविष्यात अशा काही घटना घडणार नाहीत.