बॉलीवूड अभिनेता आमीर खान याच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाने आयोजित केलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेतील गावांना प्रोत्साहन देण्यासाठी खुद्द आमीरने गुरूवारी अमरावतीतील गावात हजेरी लावली. आमीरने आज सकाळी वाठोडा गावात भल्या पहाटे श्रमदानाला सुरूवात केली. आमीरसोबत अभिनेत्री रिमा लागू, सई ताम्हणकर, अभिनेता सुनील बर्वे यांनीही श्रमदान केले. खुद्द कलाकारांनी श्रमदानला सुरूवात केल्यानंतर गावकऱयांनाही काम करण्यास प्रोत्साहन मिळाले.
श्रमदानाच्या या अनोख्या स्पर्धेत एकूण दीडशे गावं सहभागी झाली आहेत. श्रमदानाच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्याचीही पहिलीच स्पर्धा आहे. स्पर्धेतील विजेत्या गावाला ६० लाख, तर दुसऱया आणि तिसऱया क्रमांकासाठी अनुक्रमे ३० आणि २० लाखाचे पारितोषिक दिले जाणार आहे.