बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान याने चित्रपटसृष्टीत २८ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त आमिरच्या चाहत्यांनी #28YEARSOFAAMIRKHAN हा हॅशटॅग तयार केला आहे. हा हॅशटॅग बराच वेळ ट्विटर ट्रेण्डमध्येही होता.
आमिरने जुही चावलासह कयामत से कयामत तक या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि चित्रपटसृष्टीला त्यावेळी नवा चॉकलेट बॉय गवसला. या चित्रपटाने त्याला बरीच प्रसिद्धी दिली. मात्र, त्यानंतर लागोपाठ चित्रपट करूनही आमिर काही फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर दिल, अंदाज अपना अपना, इश्क, सरफरोश यांसारख्या चित्रपटातील कामाने आमिरला पुन्हा सूर गवसला. मग मात्र त्याने आपल्या कामाशी एकनिष्ठ राहत वर्षात केवळ एकच चित्रपट करायचे ठरवले. पैशाच्या मोहाला बळी न पडता आपण जे काही काम करू ते पूर्ण निष्ठेने करायचे त्याने ठरवले. चार वर्षापूर्वी आमिरने एक प्रतिक्रिया दिली होती की, केवळ पैसा कमावण्यासाठी मी एकाच वेळी दोन चित्रपट करणार नाही. एकावेळी एकच चित्रपट करण्याचा मी निर्णय घेतला आहे. केवळ मोठा बॅनर किंवा दिग्दर्शक बघून मी त्यांचे चित्रपट करणार नाही. मला जर एखाद्या चित्रपटाची कथा मनापासून आवडली तरच मी तो चित्रपट करेन. गेले २४ वर्ष मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. जेव्हा दर्जाचा विषय येतो तेव्हा मला कोणतीही तडजोड चालत नाही. मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी याची खूप मदत झाली आहे.
आमिरने स्वतःची आमिर खान प्रॉडक्शन ही निर्मितीसंस्था ही स्थापन केली आहे. या निर्मितीसंस्थेने लगान या चित्रपटाची पहिली निर्मिती केली होती. त्यावेळी या चित्रपटाने बरीच प्रशंसाही मिळवली. इतकेच नाही तर हा चित्रपट ऑस्करपर्यंतही गेला. मंगल पांडे, गजनी, तारे जमीन पर, फना, तलाश आणि यांसारख्या अनेक चित्रपटातून आमिरच्या अभिनयात विविधता आढळली आणि तो ख-या अर्थाने मि. परफेक्टशनिस्ट ठरला.