वेगवेगळ्या वाहिन्यांच्या माध्यमातून १७२ देशांतून १०० कोटी जनतेपर्यंत पोहोचलेल्या ‘झील’ समूहाने आणखी एक पाऊल पुढे टाकत आपल्या वाहिनीवरचा आशय दृष्टीहीन आणि कर्णबधिरांपर्यंतही पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्वाचा उपक्रम हातात घेतला आहे. त्याअंतर्गत स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘दंगल’चा प्रीमिअर करण्यात येणार असून त्यासाठी दृष्टीहीन प्रेक्षकांसाठी ऑडिओ वर्णन आणि कर्णबधिरांसाठी सबटायटल्स या फॉर्मेटमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

झील समूहाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मनोरंजनाच्या क्षेत्रात अग्रणी असलेल्या या वाहिनीने आपला २५ वा वाढदिवस अशा वेगळ्या पध्दतीने साजरा करायचे ठरवले आहे. १५ ऑगस्टला दुपारी १२ वाजता दृष्टीहीन प्रेक्षकांना ऑडिओ वर्णनासह ‘दंगल’ दाखवण्यात येणार आहे. दर आठवडयाला १०.९ कोटीपेक्षा जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या ‘झी सिनेमा’वर ऑडिओ वर्णन आणि सबटायटल्स सहित ‘दंगल’ चे प्रसारण झाल्यानंतर निश्चितच वाहिनीची व्यापकता अधिक वाढेल, असा विश्वास समूहाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. ऑडिओ वर्णन फीड डिश टीव्ही, टाटा स्काय, व्हिडिओकॉन आणि एअरटेलवर उपलब्ध असेल. तर एचडीमध्ये इंग्रजीत आणि हिंदीत एसडीवर सबटायटल्स उपलब्ध असतील. ऑडिओ वर्णनासह चित्रपट पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्सच्या रिमोटवर ‘लँग्वेज’ हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला ऑडिओ वर्णन पर्याय उपलब्ध होईल. तो निवडून दृष्टीहीन प्रेक्षकांना ऑडिओ निवेदनासह चित्रपट अनुभवता येणार आहे.