पाकिस्तानी कलाकारांबाबत मनसेने घेतलेल्या आक्रमकपणावर बोलून दंगल ओढावून घेण्यापासून आमिरने सावधता बाळगली. बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या आपल्या आगामी ‘दंगल’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. ‘दंगल’ चित्रपटाच्या प्रमोशनासाठी त्याने दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. आमिर खान याचा चित्रपटसृष्टीत दरारा असला तरी आगामी चित्रटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याला भीती वाटत असल्याचे दिसले. दिल्लीमध्ये ‘दंगल’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका कलाकारासाठी आपल्या चित्रपटाकडून अपेक्षा असते,  त्यामुळे सध्या मला थोडी भीती वाटत असल्याची कबुली त्याने यावेळी दिली.

दंगलपूर्वी आमिरला करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. करण जोहरच्या चित्रपटातील पाकिस्तानी कलाकारांबाबत मनसेने घेतलेल्या आक्रमकपणावर बोलून दंगल ओढावून घेण्यापासून आमिरने सावधता बाळगली. करण जोहरच्या वादग्रस्त चित्रपटासंदर्भातील प्रतिक्रिया जानेवारीमध्ये देईन असे त्याने सांगितले. आपल्या वक्तव्यामुळे आगामी दंगल चित्रपटावर काही परिणाम होऊ नये, यासाठी त्याने आपली प्रतिक्रिया दंगलच्या प्रदर्शनानंतर म्हणजे जानेवारीमध्ये देईन असे म्हटले असावे.
दंगल चित्रपटाबाबत बोलताना आमिर म्हणाला की, मी आगामी चित्रपटाबाबत कोणत्याही विशेष अपेक्षा बाळगून नाही, पण लोकांना हा चित्रपट नक्की आवडेल अशी आशा त्याने व्यक्त केली. आमिरने यावेळी नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर देखील वक्तव्य केले. नोटाबंदीचा मला वैयक्तिकरित्या कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगत त्याने नोटाबंदीच्या निर्णयाचे पुन्हा एकदा समर्थन केले. जे लोक रोखीने व्यवहार करतात त्यांच्यासाठी नोटाबंदीमुळे समस्या निर्माण झाली आहे. माझा सर्व पैसा बँकेत असून मी सर्व व्यवहार क्रेडीट कार्डच्या माध्यमातून करत असल्याचे आमिरने सांगितले.

छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये जाऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करणे हा तर आता ट्रेण्डच बनला आहे. शाहरुख खानपासून ते सलमान खानपर्यंत प्रत्येकजण आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी छोट्या पडद्याची मदत घेतात. यात खरे तर दोघांचाही फायदा असतोच. एक तर त्या शोलाही प्रसिद्धी मिळते आणि चित्रपटाचेही प्रमोशन होते. ‘द कपिल शर्मा शो’, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी नाइट्स से बचाओ’ यांसारख्या शोमध्ये कलाकार आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करायला जातात. मात्र आमिरने यापूर्वीच दंगलच्या प्रमोशनसाठी छोट्या पडद्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.