‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान रविवारी बडोद्यात आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेला होता. पण ऐन नवरात्रीच्या दिवसांमध्ये आमिर गुजरातमध्ये गेला आणि गरबा खेळला नाही असे तर होऊच शकत नाही ना. बडोद्यातील चैतन्यमय वातावरण पाहून आमिरही बडोद्याच्या रंगात पुरता रंगून गेला. तिथे त्याने भक्ती भावाने दुर्गेची पूजा केली आणि नंतर तो चाहत्यांसोबत सेल्फी काढण्यात मग्न झाला.

सध्या आमिर त्याचा आगामी सिनेमा ‘सिक्रेट सुपरस्टार’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आमिरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून बडोद्याचे कौतुक करत म्हटले की, ‘हे माझे पहिले गरबा सेलिब्रेशन आहे. या शहराचे रंग फारच अद्भूत आहेत.’

‘सिक्रेट सुपरस्टार’ या सिनेमात झायरा वसीमची मुख्य भूमिका आहे. ‘दंगल’ सिनेमात झायराने आमिरसोबत काम केले होते. ‘सिक्रेट सुपरस्टार’मध्ये आमिर एका संगीतकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे.

हा एक संगीतमय सिनेमा आहे. सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन अद्वैत चंदन याने केले आहे. या सिनेमाची निर्मिती स्वत: आमिर खान व किरण राव यांची आहे. ‘सिक्रेट सुपरस्टार’ यावर्षी दिवाळी दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘गोलमाल अगेन’ हा रोहित शेट्टी दिग्दर्शित सिनेमाही त्याचदरम्यान प्रदर्शित होणार आहे.

‘सिक्रेट सुपरस्टार’च्या प्रमोशनशिवाय सध्या आमीर विजय आचार्या दिग्दर्शित ‘ठग्ज ऑफ हिंदोस्थान’ या सिनेमाचे चित्रीकरणही करत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेखही असणार आहेत.