बॉलीवूडचा मि.परेफ्शनिस्ट आमिर खान हा वर्षाला केवळ एकच चित्रपट करतो हे सर्वांनाच माहित आहे. त्याचा वर्षाअखेरीस येणारा चित्रपट त्याच्याच चित्रपटांचे आधीचे रेकॉर्डही मोडत असतो. २०१६ च्या सरतेशेवटी म्हणजेच गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ चित्रपटानेही आजवरचे चित्रपटांचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. तसेच, आमिरच्या ‘पीके’ चित्रपटानंतर जगभरात सर्वाधिक कमाई करणारा ‘दंगल’ हा दुसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचा केवळ निर्मात्यांनाच नाही तर एकेरी पडदा मालकांनाही फायदा झाला आहे.

‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काही चित्रपटगृहे तर जवळपास तोट्यात असल्यामुळे बंद होण्याच्याच मार्गावर होती. पण, आमिरचा एकच चित्रपट या चित्रपटगृहांसाठी तारणहार ठरला आहे. वर्षभर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनीही जितका फायदा होत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने या चित्रपटामुळे एकेरी पडदा चित्रपटगृह मालकांना नफा झाला आहे. त्यामुळे काही चित्रपटगृह मालकांनी आमिर खानला पत्र लिहायचे ठरवले. या पत्रात असं लिहलंय की, सर्वात आधी मी तुमचे आभार मानू इच्छितो. तुम्ही एक चांगला कौटुंबिक चित्रपट बनवला आहे. जो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना एकत्र बसून पाहता येईल. आताच्या घडीला छोट्या शहरांसाठी तसेच एकेरी पडदा (सिंगल स्क्रीन) चित्रपटगृहांसाठी चित्रपट बनत नाहीत. त्यामुळेच काही चित्रपटगृहे बंददेखील झाली आहेत. आमचेही चित्रपटगृह बंद होण्याच्या स्थितीत होते. पण, तुमच्या चित्रपटावर विश्वास ठेवून मी त्यास डिजिटल केले. जिथे आम्हाला फक्त आठ ते दहा हजार रुपयांची कमाई व्हायची तिथे आम्हाला ‘दंगल’ चित्रपटामुळे आतापर्यंत १.७५ लाखांची कमाई झाली आहे. तुम्ही असेच चित्रपट बनवत राहा, अशी आम्ही विनंती करतो. जेणेकरून एकेरी पडदा चित्रपटगृहांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांचा रोजगार चालू राहिल.

बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान याचा ‘दंगल’ हा चित्रपट गेल्या वर्षी २३ डिसेंबरला प्रदर्शित झाला. आता जवळपास हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण होत आला आहे. मात्र, या दरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये ‘दंगल’नेच बाजी मारल्याचे चित्र असून प्रेक्षक अजूनही याच चित्रपटाकडे खेचले जात आहेत. या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ७२१.१४ कोटींची कमाई केली आहे. कोइमोइ डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ने भारतामध्ये बॉक्स ऑफिसवर २३.४७ कोटी डॉलर कमविले आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चित्रपटाने १९७.६७ कोटी कमविले आहेत. त्यामुळे, आमिरचा हा चित्रपट जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला असून, ‘पीके’ नंतर ‘दंगल’ने ७२१.१४ कोटींची बक्कळ कमाई केली आहे. यापूर्वी, आमिरच्याच ‘पीके’ चित्रपटाने जगभरात ७९२ कोटी इतकी कमाई केली होती. पीकेचा रेकॉर्ड अद्याप कोणत्याही चित्रपटाला मोडता आलेला नाही.

कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या जीवनावर, कारकीर्दीवर बेतलेले कथानक या चित्रपटाद्वारे साकारण्यात आले आहे. अभिनेता आमिर खान, फतिमा सना शेख, सान्या मल्होत्रा या कलाकारांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या व्यक्तीरेखांनाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे.