अभिनेता आमिर खान सध्या प्रचंड रागावला आहे. कारण, गेल्याच आठवड्यात बहुचर्चित ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या आगामी चित्रपटातील त्याचा लूक लीक झाला. चित्रपटाच्या सेटवरूनच फोटो लीक झाल्यामुळे आमिर सध्या चिंतेत आहे.

कोणत्याही व्यक्तिरेखेशी समरस होऊन भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमिरने या चित्रपटातील पात्रासाठी वजन कमी केलंय. दरम्यान, अनेकांना तो याच चित्रपटासाठी दाढी वाढवत असल्याचे वाटत होते. मात्र शनिवारी लीक झालेले त्याचे फोटो पाहता सर्वांनी त्याच्या लूकविषयी लावलेला तर्क चुकीचा ठरला. लांब केस आणि मिशा या लूकमधील आमिर एखाद्या डाकूसारखाच दिसतो. पण आपले फोटो लीक झालेले आमिरला काही रुचले नाही. त्यामुळे त्याने सेटवरील सुरक्षेत वाढ केल्याचे ‘बॉलिवूड लाइफ’ वेबसाइटने म्हटलेय. मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर नेहमीच त्याच्या चित्रपटातील लूकबद्दल जागरुक असतो. चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत भूमिकेविषयी शक्य तेवढी गुप्तता कशी बाळगता येईल याचीही तो काळजी घेतो.

वाचा : ‘बाबा, प्लीज हे फोटोशूट थांबवा’

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये आमिरसोबत अमिताभ बच्चन यांचीही प्रमुख भूमिका आहे. हे दोन्ही अभिनेते स्वतःचे स्टंट स्वतःच करण्यासाठीही ओळखले जातात. ‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांमधील अॅक्शन सीनची माहिती काही दिवसांपूर्वीच त्यांना देण्यात आली. त्यासाठी ते कसून मेहनतही करत होते. हे चित्रपटातील महत्त्वाचे दृश्य असल्याचेही म्हटले जातेय. कदाचित आमिरचे लीक झालेले फोटो हे त्याच दृश्यादरम्यानचे असावेत, असा तर्क लावला जातोय.

वाचा : राम रहिमवरील चित्रपटात ही अभिनेत्री साकारणार हनीप्रीतची भूमिका

विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ पुढच्या वर्षी ७ नोव्हेंबर २०१८ला प्रदर्शित होईल.