बॉलीवूडचा मि.परफेक्टशनिस्ट त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी किती मेहनत घेतो हे काही वेगळे सांगायला नको. आगामी ‘दंगल’ चित्रपटासाठी आमिरने त्याच्या शरीरयष्टीत बराच बदल केला हे सर्वांनाच माहित आहे. आधी वजन वाढवणे आणि नंतर तितकेच वजन कमी करणे हे काही सोपे काम नाही. पण आमिरच्या याच मेहनतीमुळे त्याच्या या चित्रपटाबाबत सर्वांची उत्सुकता अधिकच वाढली. त्यानंतर आता आमिरने आपल्या चाहत्यांसाठी चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित केला आहे.  ‘दंगल’हा चित्रपट प्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे.
आमिरने नुकताच चित्रपटातील त्याचा लूक ट्विट केला आहे.  त्यात त्याने म्हटलेयं की, दोन दिवसांनी मी तरुणपणातील महावीर फोगटच्या भूमिकेचे चित्रीकरण करणार आहे. तत्पूर्वी, सेलेब्रिटी फोटोग्राफर अविनाश गोवारीकर याने काढलेले छायाचित्र.


‘दंगल’ हा चित्रपट कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या  मुली गीता, बबिता आणि संगीता यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात आमिर तरुण आणि प्रौढ वयातील महावीर फोगट यांची भूमिका साकारताना दिसेल. काही महिन्यांपूर्वीच आमिरने चित्रपटासाठी २५ किलो वजन वाढवले होते. त्यानंतर तरुणपणातील महावीर यांची भूमिका साकारण्यासाठी त्याने आपले वजन पुन्हा कमी केले असून पिळदार शरीरयष्टीतील आमिर या छायाचित्रात पाहावयास मिळतो.