अभिनेता आमिर खानच्या बहुचर्चित ‘दंगल’ या चित्रपटाचे पोस्टर सोमवारी प्रदर्शित झाले. आमिरने स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवर हे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात आमिर एका कुस्तीपटूची भूमिका साकारत असून मि. परफेक्शनिस्टने नेहमीप्रमाणे या व्यक्तिरेखेसाठी बरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीत गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चांगलीच चर्चाही रंगली आहे. आमिरचे चाहतेदेखील ‘दंगल’मधील त्याची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर आज आमिरने चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करून चाहत्यांच्या उत्सुकतेला विराम दिला. ‘दंगल’ हा चित्रपट कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या  मुली गीता, बबिता आणि संगीता यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्यासाठी पोस्टरमध्ये कुस्तीच्या आखाड्यातील मातीमध्ये आमिरचा चेहरा दाखविण्यात आला आहे. तसेच या पोस्टरवर ‘आजसे दंगल शुरू’ असे शीर्षकही देण्यात आले आहे. पोस्टरवरील आमिरचा करारी चेहरा त्याच्या चित्रपटातील व्यक्तिरेखेविषयी बरेच काही सांगणारा आहे.
dangal1