अभिनेता आमिर खानने आज प्रसारमाध्यमांसोबत त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने त्याचे आगामी सिनेमे, शाहरुखला भेटल्याचा अनुभव, पुरस्कार सोहळे यासारख्या विषयांवर गप्पा मारल्या. दंगल सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यामुळे तू राष्ट्रीय पुरस्काराला तरी उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना मी पुरस्कार सोहळ्यांना जात नाही, माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे प्रेक्षकांचे माझ्यावरचे प्रेम.

१९९६ मध्ये आमिरला फिल्मफेअरचा सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला नाही. आमिरला डावलून हा पुरस्कार शाहरुख खानला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’साठी देण्यात आला होता. आमिरच्या मते, रंगीला या सिनेमातील त्याने साकारलेल्या मुन्ना या व्यक्तिरेखेसाठी त्याला पुरस्कार मिळायला हवा होता. त्यानंतर आमिरने पुरस्कार सोहळ्यांवर बहिष्कारच टाकला. असे असले तरी यावर्षी दंगलसाठी आमिरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमात त्याने महावीर सिंग फोगटची भूमिका साकारली होती.

दरम्यान, आमिर खान लवकरच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात स्वातंत्र्यपूर्व काळ साकारण्यात येणार असून, फिलिप मिडॉस टेलर यांच्या ‘कन्फेशन ऑफ ठग्स’ या कादंबरीवर सिनेमाचे कथानक आधारलेले आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आमिरचे बदलते लूक पाहता हे लूक त्याच्या सिनेमासाठीच असल्याचे म्हटले जात आहे. पण, याबद्दल फार काही माहिती प्रसारमाध्यमांसमोर उघड न करता, ‘आम्ही सध्या विविध लूक्स पाहात आहोत. माझा आताचा लूक हा त्यापैकीच एक आहे’, असे आमिर म्हणाला.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याविषयी सांगताना आमिर म्हणाला, ‘यंदाचे वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे. मी अमितजींचा खूप मोठा चाहता असून, त्यांच्यासोबत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. यासाठी मी फार उत्सुक आहे. त्यांचा अभिनय आणि त्यांचं चित्रपटसृष्टीतील स्थान पाहता मला त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळेल. हा चित्रपट माझ्यासाठी नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे’.

नुकतीच आमिर आणि शाहरुखची भेट झाल्यामुळे हे दोन्ही खान अभिनेते रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याबद्दल सांगताना, आम्ही सहजच भेटल्याचे सांगत त्या भेटीत कामाविषयी कोणतीच चर्चा झाली नाही, असे त्याने स्पष्ट केले.