बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान गेल्या १६ वर्षापासून पुरस्कार समारंभापासून दूर राहणे पसंत करतो. पुरस्कार सोहळ्यात आपल्याला नेहमी डावलले जाते असे पाहून आमिर खानने पुरस्कार सोहळ्यांपासून चार हात दूर राहण्याचा संकल्प केला होता. ज्यावेळी आमिरच्या लगान चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. त्यावेळी त्याने आपला निश्चय मोडल्याचे पाहायला मिळाले. आमिर खान ऑस्करच्या सोहळ्यासाठी गेला होता. परंतु त्याला त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला नाही. तेव्हापासून आतापर्यंत आमिरने एकाही पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली नव्हती. मात्र, तो आता  एका पुरस्कार सोहळ्याला हजर राहणार आहे. आमिर खानला मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या स्मरनार्थ दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी देशासह परदेशात कमालीचे प्रदर्शन करणाऱ्या ‘दंगल’ चित्रपटासाठी त्याचा गौरव करण्यात येणार आहे.

आमिरशिवाय अभिनेत्री वैजयंतीमाला आणि भारतीय क्रिकेट संघाला पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या कपिल देवला देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘रुस्तम’ चित्रपटातील अभिनयाबद्दल अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर ‘दंगल’ चित्रपटाला डावलल्यामुळे नाराजीचा सूर उमटताना दिसला. मात्र, बॉलिवूडमधील जाणकारांच्या अंदाजानुसार, आमिर कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात सहभागी होत नसल्यामुळेच ‘दंगल’ चित्रपटातील आमिरच्या अभिनयाचा विचार केला नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच फिल्मफेअर आणि इतर पुरस्कारांमध्येही यंदा ‘दंगल’ दुर्लक्षित झाल्याचा सूर बॉलिवूडमध्ये उमटताना दिसतोय. आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या नामांकनासाठी सेलिब्रेटींनी नुकतेच मतदान केले. यामध्ये दंगल चित्रपटाला नामांकन मिळाले नसल्यामुळे अनेक कलाकारांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाने भारतातच नव्हे तर परदेशातही चांगली कमाई केल्याचे पाहायला मिळाले.