आमिर खानचा ‘दंगल’ सिनेमा चीनमध्ये सध्या दंगलच करतो आहे. चीनमधील लोकांना हा सिनेमा एवढा आवडलाय की, चीनमधील बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणारा ‘दंगला’ हा एकमेव परदेशी सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने आतापर्यंत ११.७ कोटी डॉलरची कमाई केली. चीनची लोकप्रिय तिकीट वेबसाइट ‘माओयान’ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये ‘दंगल’ ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता.

आतापर्यंत या सिनेमाने ८० कोटी युआन एवढी कमाई केली आहे. एका प्रमुख मनोरंजन सल्लागार समुहाने दिलेल्या नवीन आकड्यांनुसार, ‘दंगल’ सिनेमाच्या तिकिटांची विक्री ११.७ कोटी डॉलरपेक्षाही जास्त झाली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत मोजायची झाली तर ‘दंगल’ सिनेमाने ७५३.२३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने भारतातल्या कमाईपेक्षा दुप्पटीने जास्त कमाई फक्त चीनमध्ये केली.

चीनमध्ये जबरदस्त कमाईमुळे ‘बाहुबली’नंतर १५०० कोटींच्या आसपास गल्ला जमवणारा ‘दंगल’ हा दुसरा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाची कथा महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या दोन मुली यांच्या आयुष्यावर बेतलेली होती. चीनमध्ये आमिर खान फारच लोकप्रिय आहे. आमिरच्या ‘थ्री इडियट’नेही चीनमध्ये चांगला व्यवसाय केला होता. तर ‘पीके’ सिनेमा चीनमध्ये १०० कोटी रुपयांचा गल्ला कमावणारा पहिला हिंदी सिनेमा ठरला होता. आमिरही त्याच्या सिनेमाला चीनमध्ये मिळणारा प्रतिसाद पाहून फार आनंदी आहे.