आमिर खानच्या बहुचर्चित ‘दंगल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पीके आणि बॉलिवूडचा सुलतानच्या ‘बजरंग भाईजान’ या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे. प्रदर्शनापूर्वीपासून चर्चेत असणाऱ्या या चित्रपटाला परदेशातही चांगली पसंती मिळाली होती. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच १०० कोटींच्या कमाईचा आकडा पार करत बॉक्स ऑफिसवरील इतर चित्रपटांच्या आतापर्यंतच्या कमाईचे सर्वच विक्रम मोडीत काढले होते. त्यानंतर आता कमाईच्या बाबतीत आणखी एक विक्रम ‘दंगल’च्या नावे नोंद झाला आहे. आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाने मुंबईतील चित्रपटगृहाच्या खिडकीवर विक्रमी कमाई केल्याचे दिसते. या चित्रपटाने देशभरात विक्रमी कमाई तर केलीच आहे. पण केवळ एकट्या मुंबई शहरामध्ये तब्बल १०० कोटींच्यावर कमाई करुन एक नवा विक्रम रचला आहे, अशी माहिती ‘पिंकविला’ या संकेतस्थळाने दिली आहे. एकंदरीत चित्रपटाच्या कमाईचा विचार केल्यास या चित्रपटाने आतापर्यंत भारतात ३७१ कोटींची कमाई केली आहे.

कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या जीवनावर, कारकीर्दीवर बेतलेले कथानक या चित्रपटाद्वारे साकारण्यात आले आहे. अभिनेता आमिर खान, फतिमा सना शेख, सान्या मल्होत्रा या कलाकारांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या व्यक्तीरेखांनाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शनादरम्यान मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाचा आमिरच्या ‘दंगल’ या चित्रपटावर परिणाम होणार का? याबद्दल आमिरच्या मनातही अनेक प्रश्न होते. पण, चित्रपटाच्या कमाईचे सध्याचे आकडे पाहता ‘दंगल’ने विक्रमी कमाई केली होती.

आमिर खानच्या बहुर्चित दंगल चित्रपटाने भारतीयांनाच नव्हे तर परदेशातील दर्शकांनाही भूरळ घातल्याचे दिसत आहे. भारतासोबतच हा चित्रपट समिक्षणासाठी अमेरिकेमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आला होता. २१ डिसेंबरला अमेरिकेत ‘दंगल’ प्रदर्शित करण्यात आला होता. आमिरच्या या चर्चित चित्रपटाची भारतापासून अमेरिकेत देखील सकारात्मक समीक्षा पाहायला मिळाली. परफेक्शनिस्ट आमिरचा आतापर्यंतचा हा सर्वात उत्कृष्ट चित्रपट असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. ‘दंगल’ मधील गीता-बबिता फोगटच्या तारूण्यावस्थेतील भूमिकेतील फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्या भूमिकांवरही चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत.