जुन महिन्यात चेन्नईमध्ये इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची रेल्वे स्थानकाच्या फलाटावर हत्या करण्यात आली होती. गायक अभिजीत भट्टाचार्य याने हा हल्ला ‘लव जिहाद’चा एक भाग असल्याचे ट्वीट केले होते. यावर अनेक ट्विटरकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली.
दिल्लीस्थित महिला पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनीही अभिजीतच्या ट्वीटवर आक्षेप घेत, समाजात तेढ निर्माण करणारे ट्वीट केल्याने अभिजीतला तुरुंगात टाकायला हवे, असे ट्वीट केले होते. अभिजीतने याला शिवराळ भाषेत प्रत्युत्तर दिले होते.
आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी अभिजीत विरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार आपच्या नेत्या मेनन यांनी ट्विटरवरुन माझ्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी २६ जुलैला अभिजीतला अटक केली होती आणि नंतर त्याची जामीनावर सुटका झाली, असे त्या म्हणाल्या.
मेनन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अभिजीतचा फोन जप्त केला होता आणि फोनमधील माहितीची तपासणी केली. याशिवाय पोलिसांकडून त्याला त्याचे ट्विटर अकाउंट बंद करण्याचे किंवा आक्षेपार्ह ट्विट काढून टाकण्याचेही आदेश देण्यात आले होते. अभिजीत ट्विटमुळे अनेकदा अडचणीत आला असून अनेक वाद त्याने ओढवून घेतले आहेत.