हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या काही चित्रपटांपैकी एक म्हणजे, १९७३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘अभिमान’. सांगितिक बहर असलेल्या या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मूख्य भूमिका साकारल्या होत्या. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात बिंदू, असरानी यांसारख्या कलाकारांनीही उल्लेखनीय व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. अशा या सदाबहार चित्रपटाला आज ४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. याचेच औचित्य साधत बिग बी अमिताभ बच्चन यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटला अनेक चाहत्यांनी आणि चित्रपट सृष्टीतील कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या कारकिर्दीतील लक्षणीय चित्रपटांमध्ये अनेक सिनेरसिकांनी ‘अभिमान’ या चित्रपटालाही पसंती दिली होती. ‘अभिमान’ चित्रपटाच्या लोकप्रियतेचे आणखी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे संगीत. एस. डी. बर्मन यांच्या संगीताने परिपूर्ण अशा या चित्रपटातील गाण्यांनाही सिने व संगीत रसिकांनी फार पसंत केले होते. चित्रपटाचे कथानकच मुळात संगीतावर आधारलेले असल्यामुळे आजही ‘अभिमान’ची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या लेखणीने शब्दबद्ध केलेली ही सुमधुर गीते लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार या नामवंत आणि पट्टीच्या गायकांनी गायली होती. ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’, ‘पिया बिना’ या गाण्यांसह चित्रपटातील इतर सर्वच गीते आणि अमिताभ व जया यांच्या जोडीने साकारलेल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ‘अभिमान’ मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनेत्री जया बच्चन यांना ‘फिल्मफेअर’तर्फे ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.