तुम्ही कोणत्या व्यक्तीचे मुलं आहात याने काहीच फरक पडत नाही. तुमचा चित्रपट फ्लॉप गेला की लोक फोन उचलण बंद करतात, असे बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन म्हणाला. रिफ्यूजी या २००० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या अभिषेकने त्याच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. ‘गुरु’, ‘धूम’, ‘बंटी और बबली’, ‘दोस्ताना’ आणि ‘बोल बच्चन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली गेली तर काही चित्रपटांसाठी त्याला अवहेलनाही सहन करावी लागली.
अभिषेक म्हणाला की, चित्रपटसृष्टीत मी १६ वर्ष पूर्ण केली असून यादरम्यान अनेक चढ-उतार पाहिले. मी खूप काही शिकलो आणि यापुढेही माझी शिकण्याची इच्छा आहे. माझा हा प्रवास खूप मस्त होता आणि मला अभिमान आहे की मी चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे. आयुष्यात अपयशी होणेही गरजेचे असते. यामुळे तुम्ही खूप काही शिकता. मला वाटत की अपयशाशिवाय यश मिळत नाही. हे तुम्हाला जमिनीवर राहण्यास मदत करते आणि इतरांची प्रशंसाही करायला शिकवते.
पुढे तो म्हणाला की, जेव्हा आमचे चित्रपट पडतात तेव्हा लोक फोनही उचलणे बंद करून टाकतात. त्यानंतर तुम्ही कितीही मोठ्या सेलिब्रेटीचे मुलं असलात तरी काहीही फरक पडत नाही. चित्रपटाचे न चालणे हा सर्वात वाईट अनुभव असतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात चांगल व्हावं, तर आपल्यासोबत सर्व काही चांगलच होणार हा विचार सर्वात आधी तुम्ही स्वतः करायला हवा. याचसोबत अभिषेकने सोशल मिडीयावर उडवल्या जाणा-या विनोदांबाबतही चर्चा केली. चित्रपट निवडीबाबत अभिषेकची सोशल माध्यमांवर अनेकदा खिल्ली उडवली जाते. त्याबाबत तो म्हणाला, जर तुम्ही सोशल मिडीयावर कार्यरत असाल तर अशा गोष्टींमध्ये तुमचा समावेश होणारच. पण याचा माझ्यावर फारसा काही परिणाम होत नाही. हे सर्व हास्यविनोदासाठी आणि मजेसाठी केले जाते. पण मला जेव्हा कधी वाटत की या सर्व गोष्टींनी मस्करीची सीमा ओलांडली जातेय तेव्हा मी प्रतिक्रिया देण बंद करतो, असेही अभिषेक म्हणाला.