बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा चिमुकला ‘अबराम’चा आज तिसरा वाढदिवस असून, खान कुटुंबियांनी अबरामचा वाढदिवस ३० हजार फूट उंचीवर सेलिब्रेट केला. नुकतेच करण जोहरने लंडनमध्ये असताना अबरामसोबतची छायाचित्रे आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. त्यानंतर आज मायदेशी परतत असताना शाहरुख, त्याची मुलगी सुहाना यांनी अबरामचा वाढदिवस विमानातच सेलिब्रेट केला.

शाहरुखने आपल्या इंस्टाग्रामवर अबरामचे एक छायाचित्र पोस्ट केले असून, छायाचित्रात अबराम विमानात आपल्या सीटवर चिप्सचा आनंद लुटताना दिसतो. तर सुहाना मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसते. शाहरुखने हे छायाचित्र पोस्ट करून आम्ही केकची वाट पाहत असल्याचे कॅप्शन दिले आहे. याशिवाय, अबरामचा वाढदिवस विमानात साजरा केल्याने शाहरुखने आम्ही तब्बल ३० हजार फूट उंचीवर अबरामचा वाढदिवस संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शाहरुख आपल्या मुलांसोबत व्यतीत केलेले क्षण नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर पोस्ट करत असतो. नुकतेच काही दिवसांपूर्वी शाहरुख आपला मोठा मुलगा आर्यनच्या पदवीग्रहण सोहळ्याला मुलासोबत उपस्थित होता. त्याचीही छायाचित्रे शाहरुखने शेअर केली होती.