अभिनेता धनुषच्या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत ‘कबाली’चा सिक्वेल बनवणार आहे. धनुषने या संबंधी एक ट्विट केले आहे. या प्रोजेक्टवर तो सुपरस्टार रजनीकांत आणि कबालीचे दिग्दर्शक पा रंजीत यांच्याबरोबर काम करणार आहेत. हा सिनेमा ‘कबाली-२’ या नावाने बनणार असल्याची बातमी आहे. धनुषने ‘कबाली’चा सिक्वेल बनवण्यासाठी सिनेमाचे निर्माते कलैपुली एस थानी यांच्याशी परवानगी घेतली आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित होणारा ‘२.०’ या सिनेमानंतर धनुषचा हा प्रोजेक्टवर काम केले जाणार आहे.
‘काका मुतै’ आणि ‘विसारणाय’ यांसारख्या सिनेमांची निर्मिती केल्यानंतर धनुष या सिनेमाची निर्मिती वण्डरबाय फिल्म्स या बॅनरखाली बनवणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कबालीच्या चरित्रावर सिनेमा बनवणं उत्सुकत्याचं असेल आणि या कथेला संपूर्णपणे वेगळ्या धाटणीमध्ये प्रेक्षकांसमोर आणण्याचा या टीमचा मानस आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा कबाली हा सिनेमा २२ जुलैला प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाला घेऊन रजनीकांत यांच्या फॅन्समध्ये खूप उत्सुकता होती. सिनेमाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच थिएटर्सच्या बाहेर तिकीटांसाठी लांबच्या लांब रांग लागली होती. काही ठिकाणी ऑफिसमध्येही सुट्टी देण्यात आली होती. तर एका ऑफिसने पीव्हीआरसोबत टायअप करुन आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत तिकीटही दिले होते.
या सिनेमात रजनीकांत यांना तरुण आणि वृद्ध अशा दोन रुपात दाखवण्यात आले होते. रजनीकांत यांचा तरुणपणीचा लूक त्यांच्या फॅन्सना फारच आवडला. सिनेमात रजनीकांत यांच्या पत्नीची भूमिका बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने साकारली होती. ७५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने पहिल्या १३ दिवसांमध्येच ३५० कोटींची कमाई केली होती.