हिंदी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध अभिनेत्यांपैकीच एक अभिनेता म्हणजे धर्मेंद्र. ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील नसराली येथे जन्मलेल्या धर्मेंद्र यांना बॉलिवूडमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवरही टाईम्स मासिकाने जगातील सर्वात जास्त सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्यांमध्ये धर्मेंद्र यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला होता. हिंदी चित्रपट सृष्टीतील या रांगड्या अभिनेत्याचे खरे नाव आहे धरम सिंग देओल. धर्मेंद्र हे जितके त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत होते तिकतेच ते आजही चर्चेत आहेत ते म्हणजे त्यांच्या खाजगी जीवनामुळे.

अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची प्रेमकहाणी फारच रंजक आहे. ‘ड्रीम गर्ल’, ‘शोले’, ‘रजिया सुलताना’ यांसारख्या विविध चित्रपटांमध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यानच धर्मेंद्र हेमा मालिनींच्या प्रेमात पडले होते. धर्मेंद्रवर हेमा मालिनींच्या प्रेमाचे वारे असे काही स्वार होते की, ते चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कॅमेरामनला लाच देत असत. ते म्हणतात ना ‘प्यार और जंग मे सब जायज है….’ तसंच कीहसं या धम्माल प्रेमकहाणीतही पाहायला मिळालं. सरतेशेवटी इस्लाम धर्माचा स्वीकार करत आणि स्वत:चे नाव बदलत धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींसोबत लग्न केले. दिलावर खान या नावाने धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींसोबत लग्न केले.

हेमा मालिनीसोबत विवाहबद्ध होण्यापूर्वी धर्मेंद्र यांचे नाव काही अभिनेत्रींशी जोडले गेले होते. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीना कुमारी. ‘फुल और पत्थर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांच्या जवळीक निर्माण झाली होती. पण, मीना कुमारी यांच्यासोबत धर्मेंद्रचे नाते फार काळ टिकू शकले नाही. चित्रपट कारकिर्दीमध्ये धर्मेंद्र यांनी बरेच चढउतारही पाहिले. चित्रपटांच्या या लखलखत्या दुनियेत पदार्पण करण्यापूर्वी धर्मेंद्र रेल्वेमध्ये क्लर्कची नोकरी करत होते. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणाऱ्या धर्मेंद्र यांनी अभिनयाव्यतिरिक्त राजकारणातही त्यांचे नशीब आजमावले. अशा या दमदार अभिनेत्यावर सध्या चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.