एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असताना या चित्रपटाबद्दलच्या मुलाखती आणि चित्रपटाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कार्यक्रमांना कलाकार हजेरी लावत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रभासच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये कुतूहल पाहायला मिळतंय त्यासोबतच अभिनेता राणा डग्गुबती साकारत असलेल्या ‘भल्लालदेव’ या पात्राविषयीही प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. राजामौलींच्या या चित्रपटामध्ये राणा बलाढ्य ‘भल्लालदेव’ ही नकारात्मक झाक असलेली भूमिका साकारत असल्यामुळे तो बाहुबलीच्या मार्गात कशी आणि किती संकटं उभी करतो याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. २८ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल एका मुलाखतीत राणाने त्याचे मत मांडले.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून ‘बाहुबली २’ आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये साम्य असल्याचे म्हटले जात होते. याविषयी प्रश्न विचारला असता राणा म्हणाला, ‘बाहुबलीला ‘गेम ऑफ थ्रोन्स’चं भारतीय व्हर्जंन म्हणणं चुकीचं आहे. मला नाही वाटत त्यात कोणत्याच प्रकारचं साम्य आहे. तो एक टेलिव्हिजन शो आहे. आपण अशा देशात राहतो जिथे पौराणिक कथा सांगण्याची एक सुरेख परंपरा आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’पेक्षाही जास्त प्रभावी अशा महाभारत, अमर चित्रकथांनीच बाहुबलीला प्रेरणा दिली आहे आणि हेच सत्य आहे.’

राणाच्या चित्रपट कारकीर्दीमध्ये ‘बाहुबली’ हा चित्रपट महत्त्वाचा असला तरीही याच चित्रपटाच्या बळावर त्याच्या पात्रतेचे आणि अभिनय कौशल्याचे निकष ठरवले जाऊ नयेत असंही त्याने मुलाखतीत सांगितलं. याविषयी सांगताना राणा म्हणाला, ‘तुम्ही इतर कोणत्याही चित्रपटाची तुलना ‘बाहुबली’ या चित्रपटाशी करु शकत नाही. इथे ‘गाझी अॅटॅक’ या चित्रपटाचंच उदाहरण घ्या. तो संपूर्णपणे वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता. त्यामुळे मी कोणत्या प्रकारच्या चित्रपटामध्ये काम करत आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. मी जर पुन्हा एकदा युद्धपटात काम केलं आणि तो चित्रपट जर अपयशी झाला तर त्या चित्रपटाची तुलना माझ्या इतर चित्रपटांशी केली जाईल.’