मॅजेस्टिक गप्पा’ कार्यक्रमात अभिनेता सुबोध भावे यांचे रोखठोक मत

महाराष्ट्राला विविध कलांची मोठी परंपरा असली तरी दर्जेदार, जुने चित्रपट आणि नाटकांचे दस्तावेजीकरण करण्यात आपण कमी पडतो. कलेचा हा वारसा आपल्याला जपता आलेला नाही, असे रोखठोक मत अभिनेता सुबोध भावे यांनी ‘मॅजेस्टिक गप्पा’ या कार्यक्रमात व्यक्त केले. नौपाडा येथील हितवर्धिनी सभेचे स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय यांच्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यक्रमाचे तिसरे पुष्प पत्रकार अमोल परचुरे यांनी अभिनेते सुबोध भावे यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून  उलगडले.

इतिहास, संस्कार तसेच माणसांची किंमत उरलेली नाही. माणूस कर्तृत्वाने मोठा होतो हेच पटत नाही. जुन्या नाटक आणि चित्रपटांचे छायाचित्र आणि कागदपत्रे आपण साठवली नाहीत. तसेच गड-किल्ल्यांचीही तीच अवस्था आहे. एकही ऐतिहासिक वास्तू जपता आलेली नाही. त्यासाठी आपण सरकारवर अवलंबून राहतो. गड-किल्ल्यांच्या प्रत्येक दगडातून इतिहास बोलत असतो. त्यामुळे प्रत्येक वास्तूबद्दल संवेदना जाग्या झाल्या पाहिजेत, असे भावे यांनी ऐतिहासिक दस्तावेजाबाबत बोलताना सांगितले.

महाविद्यालयीन जीवनात पुण्यातील पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत मी अभिनय शिकलो. ते आमच्यासाठी पाचवर्षीय प्रशिक्षण शिबिरच होते. बालपण पुण्यात गेल्याने पुण्यातून मुंबईत येणे म्हणजे भारत सोडून पाकिस्तानला जाण्यासारखे होते, असा खुमासदार टोलाही त्यांनी लगावला. मात्र, मुंबईत घर घेतल्यानंतर आता मुंबईकरही झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. ‘बालगंधर्व’ यांनी स्त्रियांना त्या काळात खऱ्या अर्थाने सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली असल्याने ते वैचारिकदृष्टय़ा श्रीमंत आहेत. कोणतीही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना त्या व्यक्तीवर श्रद्धा ठेवून काम करावे लागते. त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करावा लागतो. अभिषेकीबुवा यांनी खऱ्या अर्थाने जीवनातील अस्थिरता संपवली असून त्यांच्या रूपाने गुरू लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विजय तेंडुलकर उत्तम श्रोते होते. आयुष्य घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

‘पत्रांची जपणूक करणार’

समाजमाध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे खरा संवाद तुटत चालला आहे. माणसांची किंमत कमी झालीच आहे, पण कागदांवर उमटलेल्या अक्षरांची किंमतही राहिली नाही. ज्येष्ठ नागरिकांनी एखाद्या चित्रपटाबद्दल पत्राद्वारे अभिप्राय दिल्यावर अप्रूप असते. ज्येष्ठ नागरिकांची भावना व्यक्त करण्याची, पत्र लिहिण्याची धडपड, पत्र पोस्टाच्या पेटीत टाकेपर्यंतची मेहनत यात दिसून येते. त्यामुळे त्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या भावनांची जपणूक करावीशी वाटते.