बॉलिवूडमध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत सध्या चांगलाच आघाडीवर असल्याचे दिसते. करण जोहरच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याचे संकेत दिल्यानंतर आता त्याने आणखी एका नव्या चित्रपटासाठी सज्ज असल्याचे ट्विट केले आहे. सुशांत सिंग राजपूत रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित करत असलेल्या ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर सुशांत सिंग राजपूतने ट्विटरवरुन शेअर केले आहे. चित्रपटातील पोस्टरमध्ये सुशांतचा एक वेगळा लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या कथानकाविषयीची कल्पना देण्यासाठी पोस्टरवर हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्याचा उल्लेख केल्याचे दिसते.

यापुर्वी सुशांत सिंगने मनसुखाणी यांच्या आगामी चित्रपटात काम करत असल्याचे संकेत दिले होते. करण जोहर निर्माता असणाऱ्या ‘ड्राइव्ह’ चित्रपटात सुशांत जॅकलीन फर्नांडिससोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटातून तरुण मनसुखानी तब्बल ७ वर्षे ३४५ दिवसानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहेत. मनसुखानी यांनी यापूर्वी ‘दोस्ताना’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला चांगले यश मिळाले होते.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातील भूमिकेमुळे सुशांत सिंग राजपूतची लोकप्रियता अधिक वाढली आहे. या चित्रपटाने त्याच्या सुशांतच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. त्याचा आगामी ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे त्याच्या चित्रपटात अभिनेत्री कोण असेल, तसेच कथानक कोणत्या सत्य घटनेवर आधारित असेल, याबद्दल प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता निर्माण होईल. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी म्हणजे यावर्षी सुशांत सिंग राजपूत ‘राबता’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन दिसणार आहे. तर ‘ताकडम’ या चित्रपटातून तो ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटातील सहनायिका परिणिती चोप्रासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. एकुणच सुशांत सिंग चांगलाच फॉर्ममध्ये आहे, असेच म्हणावे लागेल.