बॉलिवूडमध्ये नायकाच्या यशामध्ये संगीताचा फार मोठा हिस्सा असतो. हीरोची इमेज बळकट करणारी आणि ती उंचावणारी गाणी लिहिली जातात. विनोदला ही कुमक मिळाली नाही. ‘रूक जाना नही तू कहीं हार के’ (इम्तिहान) आणि ‘जब कोई बात बिगड जाए’ ही त्याच्या १४१ चित्रपटांपैकी, दोनच काय ती गाणी त्याची म्हणून लक्षात राहिली. अर्थात यामुळे विनोदच्या कामगिरीत काही उणं येत नाही. उलट कोणत्याही बाह्य़ घटकावर अवलंबून नसल्यामुळे त्याचं कर्तृत्व, त्याचं यश, मोल आणखी मोठं वाटतं. दाखवेगिरी, मिरवणूक यांची त्याला गरज वाटली नाही. कोणतीही विशिष्ट हेअर स्टाईल, ड्रेस स्टाईल, दागिन्यांची स्टाईल त्यानं अवलंबली नाही. तशी गरजच त्याला पडली नाही. त्याचं रुबाबदार व्यक्तिमत्त्व या सगळ्यांपेक्षा भारी होतं.

वेगळेपणा म्हणजे काय? चमत्कार म्हणजे काय? दैव देतं आणि कर्म नेतं म्हणजे काय? क्रिकेटच्या मैदानात बाऊन्डरीपलीकडे जाण्याच्या वाटेवर असलेला चेंडू झेल कसा काय होतो?..

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
kolhapur lok sabha marathi news, hatkanangale marathi news
सन्मान नाही तोवर प्रचार नाही; संजय पाटील यांची धैर्यशील माने यांच्यावर नाराजी

..हे आणि असे बरेच प्रश्न. त्यांचं उत्तर एकच – विनोद खन्ना : त्याच्या जीवनाचा वादळी म्हणावा की अद्भुत म्हणावा असा विलक्षण पूर्वार्ध. इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये जायला निघालेला, सधन घरातला एक तरुण केवळ एका नाटकात काम केल्यावर सिनेमात जाण्याचा निर्णय घेतो.. ही घटना काही देवाच्या आळंदीला जायला निघालेला माणूस चोराच्या आळंदीला पोचला, असं म्हणण्याइतकी भयंकर नाही.

मात्र त्या तरुणाच्या औद्योगिक क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांना ती भयंकर – नव्हे, कलंककारक वाटली होती. त्यांनी म्हणे चिरंजीवांवर बंदूक रोखून त्याची वाट अडवली होती, पण त्या मुलाच्या माउलीनं पतीची समजूत घालून मुलाचा मार्ग मोकळा करून दिला. त्या मुलाच्या जीवनातलं नाटय़ इथेच थांबायचं नव्हतं. खलनायक म्हणून त्यानं पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं. (‘मन का मीत’- निर्माता: सुनील दत्त), निर्मात्याच्या धाकटय़ा भावाला (सोम दत्त) नायक बनवण्यासाठी चित्रपट तयार होणार होता, हे त्या तरुणानं खलनायकी पत्करण्याचं एकमेव कारण नव्हतं. तो जमाना शशी कपूर आणि जितेंद्रसारख्या गुलजार चेहऱ्यांचा होता. त्यांच्या जोडीला मनोजकुमार होताच; शिवाय देव आनंदचं स्थान कायम होतं. त्या परिस्थितीत बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळवायचा, तर खलनायकी पत्करण्याविना विनोद खन्नापाशी दुसरा ‘चॉइस’ नव्हता.

एका हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं काढून घ्यायचं, हा खेळ विनोद खन्नाच्या सवयीचा झाला. अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना (शिवाय धर्मेद्र आणि जितेंद्र) यांच्याशी टक्कर देणाऱ्या विनोद खन्नाचा सुपरस्टार म्हणून राज्याभिषेक होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. आकस्मिक अध्यात्म नावाच्या क्षेत्ररक्षकानं विनोद खन्नाचा सीमारेषेपाशी झेल घेतला : संन्यास घेऊन विनोदनं चंदेरी दुनियेला रामराम ठोकला आणि आपल्या गुरूची सेवा करण्यासाठी तो अमेरिकेला निघून गेला. हॉलीवूड आणि बॉलीवूड, दोघांच्या इतिहासानं अशी अद्भुत घटना पाहिली नसेल.

वन इज अ लोन्ली नंबर म्हणतात; पण सिंहासनावर बसायला निघालेल्या विनोद खन्नाच्या आयुष्यात असं काय एकाकीपण होतं? काय अस्वस्थता होती? सधन कुटुंबातून आलेल्या विनोदला चित्रपटसृष्टीत फारसा संघर्ष करावा लागला नाही. खलनायक किंवा दुय्यम नायक म्हणून चार-पाच चित्रपटच त्याला करावे लागले. तो लवकरच हिरो बनला. बघता-बघता स्टारदेखील झाला.

विनोद खन्नाचं व्यावसायिक जीवन आबादीआबाद होतं आणि कौटुंबिक जीवनदेखील दृष्ट लागावी इतकं सुखी न् स्थिर होतं. त्याच्या कौटुंबिक, सामाजिक दर्जाला शोभेशी जोडीदार त्याला मिळाली होती. त्यांचा प्रेमविवाह होता. त्यांना दोन मुलगे होते. इतर नटांप्रमाणे विनोदच्या वैवाहिक जीवनाबद्दल काही बरंवाईट ऐकायला मिळत नव्हतं. शूटिंग संपल्यावर पाटर्य़ामध्ये रमणं हा त्याचा विरंगुळा नव्हता. त्याचं मन वाचनात रमत होतं. शास्त्रीय संगीताचा तो चाहता नव्हे, भक्त होता. शूटिंग संपल्यावर भीमसेन जोशींच्या कार्यक्रमाला तो पुण्याला जायचा आणि मैफल संपली की रातोरात मुंबईला परतायचा. शूटिंगला हजर व्हायचा.

आपलं दिमाखदार घर आणि संपन्नता यांचं प्रदर्शन विनोद खन्नानं कधीच मांडलं नाही. शूटिंग संपल्यावर तो चारचौघांसारखं साधं सरळ आयुष्य जगणारा माणूस होता. म्हणूनच आईच्या मृत्यूनंतर तो अध्यात्माकडे वळला तेव्हा कुणाला आश्चर्य वाटलं नाही. उलट, त्याची ‘इमेज’ उंचावली. वरपांगी भक्ती वाटणाऱ्या या मार्गाखाली एकाकीपणाचे, अस्वस्थपणाचे सुरुंग पेरलेले होते. कलावंतांच्या पाचवीला पुजलेल्या या गोष्टींपासून सुटका मिळवण्यासाठी गुरू दत्तसारख्यांनी एकच प्यालाचा आधार घेतला; विनोद खन्नानं अध्यात्माचा!

म्हणूनच तो आधार टिकला नाही. पाचच वर्षांत भ्रमनिरास झाला आणि संन्यास सोडून विनोद खन्ना मायदेशी परतला. मायदेशी आणि बॉलीवूडकडेसुद्धा! चमत्कार म्हणजे त्याचा हा निर्णय अचूक ठरला. संन्यास घेऊन तो अमेरिकेला गेला तेव्हा कोटय़वधी रुपयांचा फटका बसला म्हणून विनोदच्या बेजबाबदारपणाबद्दल त्याच्यावर आगपाखड करणाऱ्या निर्मात्यांनी ‘सुबह का भूला शाम को वापस आये तो उसे भटका नही कहते’ म्हणत त्याचं स्वागत केलं. त्याच्यावर करारांचा वर्षांव केला. विनोद खन्ना पुन्हा एकदा ‘टॉप स्टार्स’च्या वर्गात रुबाबानं दाखल झाला.

दैवगती ही अशी विलक्षण असते जे दैव विनोदला एका हातानं देणगी देऊन ती दुसऱ्या हातानं काढून घेत होतं, तेच दैव विनोदला संकटात लोटल्यावर त्याला पुन्हा उचलून कडेवर घेत होतं. ते त्याला आधी व्हिलन बनवत होतं आणि मग हिरो. ते त्याला सुपरस्टारच्या सिंहासनापाशी पोचताक्षणी मागे खेचत होतं आणि पुन्हा त्याला तिथपर्यंत नेत होतं.

विनोद खन्नाच्या अद्भुत कहाणीचा खेळ इथेच थांबत नाही. त्यानं त्याला पुष्कळदा साथसोबत केली. विनोद खन्नानं फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला त्या सुमारास रोमॅन्टिक हिरोचा प्रभाव कमी होत चालला होता. सामाजिक, राजकीय परिस्थिती बदलत चालली होती. स्वातंत्र्यपूर्व काळातले आदर्श संपले होते. भ्रष्टाचार, अनाचार, स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद पोखरत होते. जनमानसात खदखदणाऱ्या या असंतोषानं भाबडय़ा आदर्शवादी नायकाला बाजूला सारलं आणि न-नायकाला- अँटी हिरोला- जवळ केलं. त्यामुळेच खलनायकी भूमिकांनी सुरुवात करणारा अमिताभसारखा विरूप चेहऱ्याचा नट प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला. रूप असूनही चेहरा गोंडस नसलेल्या विनोद खन्नाचाही त्यांनी मनापासून स्वीकार केला. हिंसक दहशतवादाचा फैलाव आणि भ्रष्ट राजकारण यांनी देशभक्त नायकाला कधी गुप्त हेराचा, तर कधी टोळीदादाचा वेश चढवला. राजेश खन्ना मागे पडला आणि अमिताभच्या ‘अँग्री’ हिरोचा जमाना सुरू झाला.

विनोद खन्ना त्याच्या बरोबरीनं चालत राहिला. प्रसंगी त्याच्या पुढे गेलेला दिसला. ताडमाड उंची अन् बुलंद आवाज ही अमिताभच्या चलतीची कारणं होती, तर एखाद्या शिल्पासारखी घडीव, घाटदार शरीरयष्टी आणि रुबाबदार, सतेज व्यक्तिमत्त्व ही विनोद खन्नाची हुकमी अस्त्रं होती. त्यांनीच त्याच्या खलनायकीच्या रस्त्यावरचा प्रवास झटपट संपवला आणि त्याला नायकाच्या राजमार्गावर आणून सोडलं. विनोदच्या नजरेत हुकमत होती, पण उग्रता आणि दुष्टता नव्हती. तो मूळचा भला, पण परिस्थितीनं गुन्हेगारीकडे वळलेला तरुण म्हणून अ‍ॅन्टी हिरोच्या साच्यात चपखल बसला आणि पोलीस अधिकारी किंवा सैन्याधिकारी नायक असेल, तर विनोद खन्नाला पर्याय नव्हता. म्हणूनच आठव्या-नवव्या दशकांमध्ये रुपेरी पडद्यावर चोर-शिपाई हा खेळ रंगात आला, तेव्हा विनोद शिपायाच्या भूमिकेत अधिक वेळा दिसला.

विनोद खन्नासारखा अस्सल मर्दानी देखणा चेहरा भारतीय चित्रपटामध्ये कमीच दिसतो. त्याचं आणखी वेगळेपण म्हणजे त्याचा ‘क्लास’! त्याचा आब आणि चेहऱ्यावरचं तेज. ‘कच्चे धागे’ – दरोडेखोर म्हणून दिसणाऱ्या विनोद खन्नाला ‘मीरा’मध्ये राजपूत राणा म्हणून स्वीकारणं प्रेक्षकांना कठीण जायचं नाही. शिस्तीचा आणि छडीचा बडगा न उगारता उनाड विद्यार्थ्यांना प्रेमानं सुधारणारा त्याचा ‘इम्तिहान’मधला शिक्षक म्हणून तो विश्वासार्ह वाटला. त्या वेळी त्याच्या नजरेत हुकूम दिसला नाही; दृढनिश्चय, निर्धार आणि त्या मस्तीखोर मुलांबद्दल विश्वास दिसला. ‘इम्तिहान’ ही ‘टू सर विथ लव्ह’ या गाजलेल्या हॉलीवूडपटाची न जमलेली हिंदी आवृत्ती खरी, पण विनोद खन्नाचं वेगळं रूप त्या चित्रपटानं दाखवलं हे नाकारता येणार नाही.

विनोद खन्नातला नायक राज खोसला, गुलजार आणि अरुणा व विकास देसाई या दिग्दर्शकांनी ओळखला. ‘मेरा गाव मेरा देश’मध्ये विनोदला खलनायक बनवणाऱ्या खोसलांनी ‘कच्चे धागे’मध्ये त्याला हिरो बनवलं. गुलजारनं ‘अचानक’ आणि ‘मीरा’मध्ये त्याच्या व्यक्तिरेखांना संवेदनशीलतेचा रंग दिला. विश्वासघातकी पत्नीची हत्या करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यामधला माणूस दाखवणारे किती तरी प्रसंग ‘अचानक’मध्ये पाहायला मिळतात. त्याची शुश्रूषा करणाऱ्या नर्सशी त्याचे वत्सल धागे जुळतात. ठरावीक वेळी तिच्या भेटीला येणाऱ्या तिच्या मित्राप्रमाणेच सांकेतिक शीळ घालून तो तिची गोड फसवणूक करतो, हा त्या चित्रपटातला एक लोभसवाणा, संस्मरणीय क्षण!

‘अचानक’च्या आधी ‘मेरे अपने’तून गुलजारनं विनोदमधल्या  नायकाची खरी ओळख करून दिली. बेकारीमुळे राजकारण्यांच्या हातातलं बाहुलं बनून जाळपोळ, दंगेधोपे आणि हिंसक उचापती करणाऱ्या तरुणांच्या दोन टोळक्यांमधल्या स्पर्धेचं व त्यातून उद्भवणाऱ्या विनाशाचं हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात होतं. त्या दोन टोळक्यांचे म्होरके म्हणून विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा ‘प्रेक्षणीय’ सामना बघत असतानाच एक वेगळी जाणीव होते. खलनायकी मागे सोडण्यात विनोद यशस्वी का झाला आणि नायक म्हणून शत्रुघ्न यशस्वी का झाला नाही याचं उत्तर मिळतं. व्यक्तिमत्त्वाचा आणि ‘क्लास’चा अभाव, दुसरं काय? नायकीचा हव्यास सोडून शत्रू खलनायकच राहिला असता, तर प्राण व अमरीश पुरी यांच्याप्रमाणे उत्कृष्ट (आणि ‘स्टार’) खलनायक म्हणून इतिहासात दखल झाला असता. असो.

शत्रूच्याच संदर्भात विचार केला की नायक म्हणून विनोदच्या टिकाऊ यशाचं कारणही कळतं. अभिनयातला सरळपणा, साधेपणा! अमिताभप्रमाणे विनोद उपजत नट नाही. अभिनयाची उंची आणि खोली ही परिमाणं विनोदच्या अभिनयात आढळत नाहीत. तरीही त्यानं केलेल्या प्रत्येक भूमिकेत तो चांगला वाटतो. तो ‘स्टाइल’ मारत नाही. खटकेबाज वाक्यं फेकत नाही. लकबी, हातवारे यांच्या कुबडय़ा घेत नाही. आपल्या मर्यादा तो जाणतो आणि ती लक्ष्मणरेखा चुकूनही ओलांडत नाही. भूमिका निवडताना त्याच्यातला स्टार अहंकाराचा फणा काढत नाही. ‘मीरा’ आणि ‘रिहाई’ हे नायिकाप्रधान चित्रपट होते. ‘मीरा’मध्ये तिच्या पतीच्या व्यक्तिरेखेला सहानुभूती मिळत नाही, तर अरुणा-विकासच्या ‘रिहाई’मध्ये पत्नीला परपुरुषापासून झालेलं मूल स्वीकारणाऱ्या नायकाला मोठेपणा मिळत नाही. उलट ते नामर्दपणाचं लक्षण मानलं जातं. या दोन्ही भूमिका बॉलीवूडमधल्या प्रथितयश नटांनी नाकारल्या. ‘मीरा’मधल्या राणाच्या भूमिकेसाठी प्रथम अमिताभची निवड झाली होती; पण तोवर स्टार बनलेल्या अमिताभला ती व्यक्तिरेखाच पसंत पडली नाही. वास्तविक गुलजारनं ‘मीरा’बरोबरच तिच्या पतीची कथादेखील त्या चित्रपटात सूक्ष्मपणे बोलकी केली आहे. पत्नीला वेळोवेळी समजून घेणारा, राजमाता व धर्माधिकारी यांचा राग पत्करूनही तिला साथ देणारा, पण अखेर राजसत्ता व धर्मसत्ता यांच्यापुढे निष्प्रभ होणारा राणा ‘मीरा’मध्ये पाहायला मिळतो. अंगभूत रुबाब, आब आणि संयम यांच्या बळावर विनोद खन्नानं राणाच्या भूमिकेला न्याय दिला.

मात्र, दिग्दर्शकाचा नट असल्यामुळे की काय, विनोद खन्नामधल्या अभिनेत्याची पुरेशी दखल घेतली गेली नाही. विशिष्ट चित्रपटाशी अथवा भूमिकेशी त्याचं नाव निगडित झालं नाही. ‘शोले’मधल्या गब्बर सिंगनं अमजद खानला- एक खलनायकाला न भूतो न भविष्यति अशी लोकप्रियता दिली. हीच भूमिका ‘मेरा गाव मेरा देश’मध्ये विनोदनं जब्बर या नावानं केली आहे; पण स्टाइल आणि संवाद यांची फोडणी नसल्यामुळे तिचं नाव घेतलं जात नाही. संपूर्ण ‘शोले’ हा चित्रपटच ‘मेरा गाव मेरा देश’ची त्या नाण्यापासून शेवटच्या नाचापर्यंत सीन टू सीन कॉपी आहे;. पण ‘शोले’चं ७० एमएम तंत्रवैभव नसल्यामुळे ‘मेरा गाव..’ चित्रपटाचं नाव घेतलं जात नाही. असो.

‘परिचय’मधली विनोदची दहा मिनिटांची पाहुणी भूमिकादेखील लक्षात राहते. अभिनेता एकदा ‘स्टार’ झाला की कला मागे पडते आणि झगमगाट मिरवू लागतो. हे विनोद खन्नालाही चुकलं नाही. त्याच्या कारकीर्दीच्या काळात मल्टिस्टार चित्रपटांना अवास्तव महत्त्व आलं. सतत अमिताभ, धर्मेद्र, शशी कपूर, ऋषी कपूर यांच्याबरोबर भूमिका कराव्या लागल्या. त्यात जुगलबंदी कमी आणि स्पर्धा जास्त होती. त्यातही ‘बर्निग ट्रेन’ आणि ‘राजपूत’ या चित्रपटांमध्ये त्याला आणि धर्मेद्रला चांगल्या भूमिका होत्या, विशेषत: ‘राजपूत’मध्ये. ठाकूर घराण्याची खोटी पतप्रतिष्ठा झुगारून दोघेही आपापल्या प्रेयसींचे परपुरुषांबरोबर झालेले विवाह मान्य करतात. विनोद तर आपल्या प्रेयसीचं स्वत: लग्न लावून देतो आणि तिच्या निधनानंतर तिच्या मुलाची जबाबदारी घेतो. खूप रखडल्यामुळे ‘राजपूत’ पडद्यावर आला, तेव्हा विनोद आणि धर्मेद्र यांची ‘स्टार पॉवर’ मंदावली होती. त्यामुळे त्या चित्रपटाची आणि त्या भूमिकांची उपेक्षा झाली.चर्चा होत राहिली ती विनोद खन्नानं अमिताभला दिलेल्या झुंजीची! खरं म्हणजे ‘अमर-अकबर-अ‍ॅन्थनी’पासून सुरू झालेल्या अमिताभ-विनोदच्या पार्टनरशिपमध्ये मुद्दाम उल्लेख करावं असं काहीच नाही. ‘दीवार’, ‘त्रिशूल’मध्ये अमिताभ-शशी कपूर-संजीवकुमार यांच्यात जसा सामना रंगला, तसा विनोद-अमिताभचा कोणत्याच चित्रपटात रंगला नाही.

सगळे स्टार्स अखेर मर्त्य जीव असतात. अमिताभसारखा एखादाच नशीबवान असतो. बाकी सर्वाना सद्दी संपल्यावर थांबावं लागतं. विनोद खन्नालाही थांबावं लागलं; पण इथेही नशिबानं त्याला हात दिला. सक्तीची निवृत्ती पत्करावी लागणाऱ्या कलाकारांना हल्ली राजकारणाचा (किंवा टीव्हीच्या रीअ‍ॅलिटी शोजचा) आधार मिळतो. विनोद खन्नालाही तो मिळाला. इथे मात्र त्यानं आपल्या कट्टर प्रतिस्पध्र्याला मात दिली. अमिताभ पाच र्वषदेखील राजकारणात टिकला नाही. विनोदनं मात्र बरीच र्वष राजकारणात काढली. कॅबिनेट मंत्रिपदही भोगलं. सिनेमातली करिअर संपल्यामुळे वर्षभर आजारी असलेल्या विनोदच्या प्रकृतीची ‘बुलेटिन्स’ जाहीर झाली नाहीत. लोकांच्या लक्षात राहावं म्हणून फेसबुक, ट्विटिंग यांचा आधार त्यानं घेतला नाही. हे विनोद खन्नाचं आणखी एक वेगळेपण! गेली काही वर्षे अक्षय खन्नाचा ‘डॅडी’ हीच त्याची ओळख होती. अभिनयात सरस असलेल्या अक्षयनं विनोदचा मनस्वीपणाचा वारसाही चालवला आहे. ‘टॉप’ला जाता-जाता हा गुणी तरुण नट आकस्मिक गायब झाला!