भरधाव वाहनाने तरुणाला धडक दिल्याचे प्रकरण

‘मने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्री दासानी हिने आपल्या भरधाव कारने एका तरुण व्यावसायिकाला धडक दिली. या घटनेला दोन महिने झाले पण पोलिसांनी तिला अटक केलेली नाही. भाग्यश्रीविरोधात दाखल गुन्ह्य़ात गंभीर किंवा आवश्यक ती कलमे जोडण्यात आलेली नाहीत ही आणखी धक्कादायक बाब आहे.

सांताक्रूझला राहणारा नौसिफ शेख (वय ३०) २ नोव्हेंबरला खार सब-वेहून िलक रोडच्या दिशेने जात असताना त्याची मोटरसायकल वीर सावरकर मार्गावरील सिग्नलला थांबली. मागाहून भरधाव आलेल्या एका शुभ्र रंगाच्या स्कोडा कारने नौसिफला उडवले. ही धडक इतकी जोरदार होती की नौसिफ सुमारे तीस फूट लांब फेकला गेला आणि गंभीर जखमी झाला. कारचालकाने मात्र त्याच वेगाने धूम ठोकली. पुढे एका रिक्षाचालकाच्या मदतीने नौसिफ आशा पारेख रुग्णालयात दाखल झाला.

नौसिफच्या तक्रारीत नोंद झालेल्या एफआयआरनुसार काही वेळाने भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी आणि त्यांचे सहकारी राज किशन नौसिफचा माग काढत पारेख रुग्णालयात पोहोचले. कार माझी पत्नी भाग्यश्री चालवीत होती. कृपया पोलीस तक्रार करू नकोस, तुझ्या उपचारांचा सर्व खर्च  मी करायला तयार आहे, अशी गळ हिमालय यांनी घातली. योग्य उपचारांसाठी नौसिफला होली क्रॉस रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे हिमालय यांनी २५ हजार रुपये जमा केले. या रुग्णालयात नौसिफच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

७ नोव्हेंबरला नौसिफने दासानी यांना फोन करून उपचाराला आणखी पसे अपेक्षित असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी किशन यांचा नंबर देत या पुढे त्यांच्या संपर्कात राहा, असे सांगून फोन ठेवला. नौसिफने केलेला एकही फोन किशन यांनी उचलला नाही. अखेर १९ डिसेंबरला नौसिफने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भाग्यश्रीविरोधात गुन्हा (६५१/१६) नोंदवला. मात्र  भाग्यश्रीला अटक केलेली नाही.

पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंतनू पवार यांच्या माहितीनुसार या प्रकरणात भाग्यश्रीचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. पण तिने आरोप फेटाळले आहेत. तिच्या दाव्यानुसार अपघातावेळी कार तिचा चालक चालवत होता. चौकशी, तपास सुरू आहे. नौसिफला हिमालय रुग्णालायात भेटले, पत्नी भाग्यश्री कार चालवत होती, असे सांगितले ही बाब आमच्यापर्यंत आलेली नाही, असा दावाही पवार यांनी केला. प्रत्यक्षात ही बाब एफआयआरमध्ये नमूद आहे. शिवाय भाग्यश्रीच्या चालकालाही अटक झालेली नाही.

दरम्यान, अपघातानंतर नौसिफला कोणतीही वैद्यकीय मदत न देता आरोपी पसार झाला होता. हा घटनाक्रम माहीत असूनही पोलिसांनी या गुह्य़ात मोटर वाहन कायद्यातील कलम १३४ अ व ब जोडलेले नाही. पवार यांच्या दाव्यानुसार भविष्यात वाढीव कलमे जोडण्याची मुभा पोलिसांना आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात पोलिसांना एकही स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा सीसीटीव्ही चित्रणही मिळालेले नाही. या बाबत नौसिफशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला असता त्याने बोलणे टाळले.

भाग्यश्रीचे पती हिमालय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांताक्रूझ पोलिसांवर तोंडसुख घेतले. ‘शहानिशा न करता सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा नोंदविला. अपघात घडला तेव्हा आमचा चालक कार चालवीत होता. तक्रारदार नौसिफला आम्ही आवश्यक तेवढी मदत केली. पण नंतर तो आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू लागला. मी सध्या परदेशात आहे. परत आलो की वरिष्ठांकडे सांताक्रूझ पोलिसांची तक्रार करणार आहे,’ असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.