हिमाचल चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री रिचा धिमान ही तिच्या राहत्या घरी शुक्रवारी मृतावस्थेत आढळली. २४ वर्षीय रिचा ही धर्मशाला येथे भाड्याच्या घरात राहत होती. तेथेच पोलिसांना रिचाचा मृतदेह आढळला. रिचाच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली असून यात एका पोलीस हवालादाराचा हात असल्याचे म्हटले जातेय.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांना जवळपास सकाळी ११ च्या दरम्यान सदर घटनेबद्दल माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहचले त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तिच्या घराचा दरवाजा तोडला तेव्हा त्यांना रिचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजीव गांधी म्हणाले की, रिचाच्या घरातून आत्महत्ये पूर्वी लिहलेले पत्र सापडले असून त्यात एका हवालदाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि त्याच कारणामुळे रिचाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ आणि ३४ अंतर्गत सदर घटनेची नोंद करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. रिचाचे सोशल मिडीयावर जवळपास चाळीस हजार फोलोअर्स आहेत. नागरोटा बागवान येथील मालन भागात ती राहत होती. रिचाने काही चित्रपट आणि अल्बममध्ये काम केले होते. सध्या ती एका अल्बमचे शूटींगही करत होती.

15697552_1179568002118898_4127300807684002083_n

दरम्यान, केंद्रीय मंत्री जी एस बाली यांनी रिचाच्या आई-वडिलांची भेट घेतली असून पोलिसांना सदर प्रकरणी लवकरात लवकर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, रिचाच्या फोनवर आलेल्या कॉल्सची माहिती काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून तिच्या मृत्यूचे खरे कारण समोर येण्यास मदत होईल.