सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तिहेरी तलाकसंदर्भात ऐतिहासिक निकाल दिला. सहा महिन्यात संसदेत कायदा करावा, असे आदेश केंद्र सरकारला देतानाच कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर सहा महिन्यांची बंदी असेल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. या निकालानंतर मुस्लिम महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यत अनेकांनी या निकालाचं स्वागत केलं. बॉलिवूडपासून पाकिस्तानमधील कलाकारांनीही आनंद व्यक्त केला.

‘निकाह’ या बॉलिवूड चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सलमा आगा यांनीही तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक निकाल दिल्याचं म्हटलं. यासंदर्भात त्या म्हणाल्या की, ‘हा एक सकारात्मक निकाल आहे. याचं सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं. इतिहासात आजच्या दिवसाचा आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे. घटस्फोटीत महिलेसोबतच तिच्या संपूर्ण पिढीला त्याचा त्रास सहन करावा लागतो. सहा महिन्यांमध्ये यासंदर्भात कठोर कायदा व्हायला पाहिजे.’

PHOTO : गरोदर महिलांसाठी सोहा देतेय फिटनेसचा मंत्र

सलमा यांच्या ‘निकाह’ या चित्रपटातही तिहेरी तलाकवर भाष्य केलं गेलं. घटस्फोटीत महिलेला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं यावर चित्रपटातून प्रकाश पाडण्यात आलेला. किंबहुना या चित्रपटाचं नावच ‘तलाक तलाक तलाक’ असं निश्चित झालं होतं मात्र काही कारणांमुळे ते बदलून ‘निकाह’ असं ठेवण्यात आलं. ‘निकाह’ या चित्रपटाला तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्याचं श्रेय जातं याचा मला अभिमान आहे असंही सलमा आगा यांनी म्हटलं. या निकालाबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले.